पूर्व चेक प्रजासत्ताकातील एका व्यक्तीने रुग्णालयात केलेल्या गोळीबारात सहा जण ठार झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोर फरार आहे. सार्वजनिक रेडिओ केंद्राने त्याच्या चित्रफिती व छायाचित्रे जारी केली असून पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे,  पण तो संशयित आहे किंवा नाही हे अजून समजलेले नाही. पंतप्रधान आंद्रेज बाबीस यांनी दूरचित्रवाणीवर सांगितले,की रुग्णालयाच्या प्रतीक्षा कक्षात सदर हल्लेखोराने गोळीबार केला. अगदी जवळून त्याने लोकांच्या डोक्यात गोळ्या झाडल्या.

सुरूवातीला एका लाल जॅकेट घातलेल्या व्यक्तीचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले होते, पण नंतर तो प्रमुख साक्षीदार असल्याचे सांगण्यात आले. मंगळवारी सकाळी सात वाजता ऑस्ट्राव्हा शहरात विद्यापीठ रुग्णालयात हा गोळीबार झाला. हे ठिकाण प्रागच्या पूर्वेला ३५० कि.मी. अंतरावर आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले, की इतर लोकांना रुग्णालयातून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून देशभरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. हल्लेखोर मोटारीतून आला होता. पोलिसांनी त्याच्या वाहनावर  गोळीबार करण्याचा प्रयत्न केला, पण त्याआधीच त्याने आत्महत्या केली, असे सांगण्यात आले.