जगभरात झपाटय़ाने पसरणाऱ्या कोविड-१९ विषाणूच्या संसर्गासाठी लवकरात लवकर प्रतिबंधक लस शोधण्याचे प्रयत्न जगभरात सुरू असून, सहा भारतीय कंपन्याही त्यात सहभागी झाल्या आहेत.

सुमारे ७० ‘व्हॅक्सिन कँडिडेट्स’ची चाचणी करण्यात येत असून, त्यापैकी किमान तीन मानवावरील नैदानिक चाचणीच्या (क्लिनिकल ट्रायल) टप्प्यावर पोहचल्या आहेत; तथापि या विषाणूसाठीची लस मोठय़ा प्रमाणावर वापरासाठी २०२१ पूर्वी तयार होण्याची शक्यता कमी आहे.

कोविड-१९ विषाणूचा जगभरात १.९ दशलक्षाहून अधिक लोकांना संसर्ग झाला असताना आणि त्याने १ लाख ३७ हजारांहून अधिक बळी घेतले असताना या रोगाविरुद्धच्या जागतिक लढय़ात भारतीय शास्त्रज्ञही सहभागी झाले आहेत.

झायडस कॅडिला कंपनी दोन लसींवर काम करत आहे, तर सेरम इन्स्टिटय़ूट, बायोलॉजिकल ई., भारत बायोटेक, इंडियन इम्युनॉलॉजिकल्स आणि मिनव्ॉक्स या कंपन्या प्रत्येकी एक लस विकसित करत आहे’, असे फरिदाबाद येथील ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिटय़ूटचे कार्यकारी संचालक गगनदीप कांग यांनी पीटीआयला सांगितले.

‘कोविड-१९’ महासाथीला प्रतिबंध करण्यासाठी लस तयार करण्याकरता जगभरात जे प्रयत्न होत आहे, ते व्याप्ती आणि वेग या बाबतीत अभूतपूर्व असे आहेत’, असे कोअ‍ॅलिशन फॉर एपिडेमिक प्रिपेअर्डनेस इनोव्हेशन्स (सीईपीआय) या संस्थेने अलीकडेच केलेल्या अभ्यासात नमूद केले होते. कांग हे या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत.

मात्र, करोनावरील लसीच्या तपासणीचे अनेक टप्पे असून त्यापुढे अनेक आव्हाने असल्याने ही गुंतागुंतीची प्रक्रिया असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. इतर लसींप्रमाणे ‘सार्स-सीओव्ही-२’ तयार करण्यासाठी १० वर्षे लागणार नाहीत; तथापि ती सुरक्षित व परिणाम्कारक सिद्ध होईपर्यंत आणि ती मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध होईपर्यंत किमान १ वर्ष लागू शकेल, असे कांग यांनी सांगितले.