दिल्लीसह उत्तर प्रदेशात निदर्शकांची दगडफेक, जाळपोळ; ५० पोलीस जखमी

नवी दिल्ली/ लखनऊ : सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात शुक्रवारी दिल्लीसह उत्तर प्रदेशात जनक्षोभाचा भडका उडाला. दिल्लीत वाहनांची जाळपोळ करण्यात आली, तर उत्तर प्रदेशातील हिंसाचारात सहा जणांचा मृत्यू आणि सुमारे ५० पोलीस जखमी झाले.

बिजनोरमध्ये दोन, तर संभल, फिरोजाबाद, मेरठ आणि कानपूरमध्ये प्रत्येकी एका निदर्शकाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. हिंसक जमावाला नियंत्रित करण्यासाठी आम्ही एकही गोळी झाडली नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

उत्तर प्रदेशातील १३ जिल्ह्य़ांमध्ये शुक्रवारी दुपारनंतर निदर्शने करण्यात आली. सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेशांना धुडकावून हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. निदर्शकांनी अनेक शहरांमध्ये दगडफेक केली. वाहनांना आग लावली. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार आणि अश्रुधुराचा मारा केला.

दिल्लीतील आंदोलनाचे नेतृत्व शुक्रवारी भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी केले. पोलिसांना चुकवत आझाद जामा मशिदीच्या पायऱ्यांवर उभे राहिले. त्यांनी हजारो लोकांच्या उपस्थितीत मोदी-शहांना आव्हान दिले. पोलिसांनी आझाद यांना ताब्यातही घेतले; पण ते पोलिसांच्या तावडीतून निसटले.

लाल किल्ल्यासमोर गुरुवारी रात्री आंदोलन करू पाहणाऱ्या जमावाला पोलिसांनी लगेचच ताब्यात घेतले होते; परंतु लालकिल्ल्यासमोर असलेल्या जामा मशिदीच्या आवारात शुक्रवारी सकाळपासून गर्दी जमू लागली होती. अनेकांच्या हातात तिरंगा, डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमा आणि संविधानाच्या प्रती होत्या. जंतरमंतरप्रमाणे इथेही लोक पोलिसांना गुलाबपुष्प देऊ न शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवत होते.

भीम आर्मीचे  प्रमुख चंद्रशेखर आझाद यांचा दिल्ली पोलीस शहरभर शोध घेत होते. तेवढय़ात आझाद यांनी ट्वीट करून मला अटक झालेली नाही, मी जामा मशिदीत येत असल्याचा संदेश दिला. आझाद दुपारी जामा मशिदीच्या पायऱ्यांवर दिसताच निदर्शकांनी घोषणा दिल्या. त्यांनी संविधानाची प्रस्तावना वाचून दाखवली. पोलिसांनी आझाद यांना मशिदीच्या बाहेर येण्याचे आवाहन केले.  आझाद यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, पण ते पोलिसांच्या ताब्यातून निसटले.

दिल्ली गेट भागात जमाव हिंसक

जुन्या दिल्लीतील जामा मशिदीच्या परिसरात हजारोंच्या संख्येने लोक जमले होते, मात्र त्यांनी शांततेने आंदोलन केले. जुन्या दिल्लीतील दरयागंज भागात मात्र संध्याकाळी जमावाने काही वाहनांना आगी लावल्या. हिंसक झालेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला आणि पाण्याचे फवारे मारले. जामा मशीद ते जंतरमंतपर्यंत मोर्चा काढण्यास पोलिसांनी परवानगी दिली नसल्याने जुन्या दिल्लीच्या परिसरात आंदोलकांनी सकाळपासून ठिय्या दिला होता. आंदोलकांनी संध्याकाळी पुन्हा मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी आंदोलकांना दिल्ली गेट भागात अडवले. त्यामुळे काही आंदोलकांनी जाळपोळीचा प्रयत्न केला.

 दिल्लीतील मेट्रो स्थानके, इंटरनेट बंद

शुक्रवारीही १५ पेक्षा जास्त मेट्रो स्थानके दिवसभरात वेगवेगळ्या वेळी बंद ठेवण्यात आली. जुन्या दिल्लीतील दिल्ली गेट, लाल किल्ला, चावडी बाजार, चांदनी चौक तसेच सेंट्रल सेक्रेटेरिएट, जनपथ, राजीव चौक, मंडी हाऊस, प्रगती मैदान ही मध्य दिल्लीतील महत्त्वाची मेट्रो स्थानके बंद करण्यात आली होती. दक्षिण दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया, तसेच ईशान्य दिल्लीतील जाफराबाद, मौजपूर-बाबरपूर, शिवविहार, जोहरी इन्क्लेव्ह ही स्थानकेही बंद करण्यात आली. काही भागांमध्ये इंटरनेट सेवाही खंडित करण्यात आली होती.

बिहारमध्ये एनआरसीची अंमलबजावणी नाही – नितीशकुमार

पाटणा : राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीची (एनआरसी) बिहारमध्ये अंमलबजावणी केली जाणार नाही, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. त्यामुळे सुधारित नागरिकत्व कायद्याला (सीएए) जद(यू)चा पाठिंबा असल्याच्या शक्यतांना पूर्णविराम मिळाला आहे. नितीशकुमार यांचा पक्ष भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटकपक्ष आहे.

सूचना स्वीकारण्यास सरकार तयार

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात निदर्शने करणाऱ्यांच्या सूचना विचारात घेण्याची तयारी केंद्र सरकारने शुक्रवारी दाखवली. सरकार निदर्शकांच्या सूचना स्वीकारण्यास तयार आहे. या कायद्याबद्दलच्या लोकांच्या मनातील शंका दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही सरकारी अधिकाऱ्याने स्पष्ट केले.