देशात करोना प्रतिबंधासाठी आणखी सहाहून अधिक लशींची निर्मिती होणार असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी शनिवारी केली.

देशात आतापर्यंत करोनाच्या दोन लशींची निर्मिती करण्यात आली असून त्या ७१ देशांना देण्यात आल्या आहेत. आणखी अनेक देश लशींची मागणी करत आहेत. कॅनडा, ब्राझील आणि इतर विकसित देशही भारतीय लशींचा उत्साहाने वापर करत आहेत, असे हर्षवर्धन म्हणाले. भोपाळ येथील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रीसर्च एनव्हायर्नमेंटल हेल्थ’च्या नव्या ग्रीन कॅम्पसच्या उद््घाटनप्रसंगी आरोग्यमंत्री बोलत होते.

देशात शनिवार सकाळपर्यंत लशीच्या एक कोटी ८४ लाख मात्रा नागरिकांना देण्यात आल्या आहेत. त्यापैकी २० लाख मात्रा शुक्रवारी एकाच दिवसात देण्यात आल्या, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

पूर्वी देशात करोना संसगाचे निदान करण्यासाठी एकच प्रयोगशाळा होती, मात्र आता आपल्याकडे अशा २,४१२ प्रयोगशाळा आहेत, याचा हर्षवर्धन यांनी उल्लेख केला. आतापर्यंत करोनाच्या २३ कोटी चाचण्या झाल्या आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली.

लशींवर राजकारण नको!

विज्ञानाचा आदर करा. करोनाविरुद्धचा लढा हा वैज्ञानिक लढा आहे, राजकीय नाही. त्यामुळे लशीवरून होणारे राजकारण बंद करण्याची आवश्यकता आहे, असेही हर्षवर्धन म्हणाले.

निष्काळजीपणामुळे संसर्ग

देशातील वाढत्या करोना प्रादुर्भावाबद्दल हर्षवर्धन म्हणाले की निष्काळजीपणा आणि गैरसमजुतींमुळे संसर्गात वाढ होत आहे. लस आल्यामुळे आता सगळे काही ठीक होईल, असे लोकांना वाटते. परंतु संसर्ग टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

लस घेतल्यानंतरही डॉक्टरांना संसर्ग

चंद्रपूर : कोव्हिशिल्ड लशीच्या दोन मात्रा घेतल्यानंतरही चंद्रपूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांच्यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दोन डॉक्टरांना करोनाचा संसर्ग झाला आहे. लशीची दुसरी मात्रा घेतल्यानंतर १४ दिवसांनी डॉ. गहलोत यांच्यासह डॉ. अनंत हजारे आणि त्यांच्या डॉक्टर पत्नीला संसर्ग झाला.

कडक टाळेबंदीला भाग पाडू नका : मुख्यमंत्री

मुंबई : नियम, प्रतिबंधात्मक उपायांकडे दुर्लक्ष आणि वाढती गर्दी यामुळे करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. परंतु परिस्थिती अद्याप नियंत्रणात असून हॉटेल आणि उपाहारगृहांनी नियमांचे पालन करावे, कडक टाळेबंदी लावण्यास भाग पडू नये, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिला. आपल्याला युरोपसारखी परिस्थिती होऊ द्यायची नसेल तर काटेकोरपणे आरोग्याचे नियम पाळावे लागतील. आपल्याला करोनासह जगायचे असून जीवनपद्धती त्याला अनुरूप करावी लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

देशात २४,८८२ नवे रुग्ण

  • नवी दिल्ली : या वर्षातील सर्वाधिक करोनाचे रुग्ण शनिवारी आढळले. गेल्या २४ तासांत देशात २४ हजार ८८२ जणांना संसर्ग झाला.
  • नव्या रुग्णांमुळे एकूण रुग्णसंख्या एक कोटी १३ लाख ३३ हजार ७२८ वर गेली आहे. गेल्या २० डिसेंबरला देशात २६,६२४ रुग्ण आढळले होते.
  • त्यानंतर ८३ दिवसांनी, शनिवारी सर्वाधिक म्हणजे २४,८८२ रुग्ण सापडले. गेल्या २४ तासांत १४० रुग्णांचा मृत्यू झाला.

राज्यात १५,६०२ बाधित

राज्यात शनिवारी करोनाच्या १५,६०२ नवीन रुग्णांचे निदान झाले, तर गेल्या २४ तासांत मृतांची संख्या रोजच्या सरासरीपेक्षा ३०ने वाढली आणि ८८ करोनाबांिधतांचा मृत्यू झाला. मुंबईत १,७०८, नागपूरमध्ये १,८२८, पुण्यात १,६६७, नाशिकमध्ये ६६०, तर कल्याण-डोंबिवलीत ४०९, ठाण्यात ३३८ आणि औरंगाबादमध्ये ५९१ नवे रुग्ण आढळले.