भारतात सहा रुग्ण : ९ ते २२ डिसेंबपर्यंत जगभरातून देशात दाखल झालेल्या बाधितांच्या तपासणीचा निर्णय

जगभरात नव्या करोनावताराचे सावट गडद होऊ लागले आहे. भारतात मंगळवारी नवकरोनाच्या सहा रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे ९ ते २२ डिसेंबर या कालावधीत परदेशांतून भारतात दाखल झालेल्या करोनाबाधितांचे जनुकीय क्रमनिर्धारण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.

ब्रिटनमध्ये आढळलेला नवकरोना हळूहळू अन्य देशांतही फैलावत आहे. त्यास रोखण्यासाठी भारतात प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्यात येत असतानाच देशात दाखल झालेल्या सहा जणांना नवकरोनाची लागण झाल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. त्यात ब्रिटनमधून परतलेल्या एका ४७ वर्षीय महिलेचा समावेश आहे. ही महिला २१ डिसेंबरला भारतात दाखल झाल्यानंतर रेल्वेने आंध्रप्रदेशमध्ये गेली. मात्र, तिच्या संपर्कातील अन्य कोणालाही करोनाची लागण झालेली नसल्याचे राज्याच्या आरोग्य आयुक्तांनी सांगितले. नवकरोनाची लागण झालेल्या प्रत्येकाला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

२५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीत ब्रिटनमधून भारतात दाखल झालेल्या जवळपास ३३,००० प्रवाशांची ‘आरटी-पीसीआर’ चाचणी करण्याचे आदेश केंद्र सरकारने आधीच दिले आहेत. आता त्यातील बाधितांचे जनुकीय क्रमनिर्धारण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ९ ते २२ डिसेंबपर्यंत भारतात आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांमधील सर्व करोनाबाधितांचे जनुकीय क्रमनिर्धारण करण्यात येणार आहे. या व्यक्तींच्या नमुन्यांची जनुकीय क्रमवारी उलगडण्यासाठी दहा प्रादेशिक प्रयोगशाळांची व्यवस्था करण्यात आली आहे.

ब्रिटनमध्ये आढळलेला हा नवकरोना ७० टक्के अधिक संसर्गजन्य आहे. डेन्मार्क, ऑस्ट्रेलिया, इटली, स्वीडन, फ्रान्स, स्पेन, जर्मनी, कॅनडा, जपान आदी देशांत नव्या करोनाचे रुग्ण आढळले आहेत.

‘आणखी खबरदारी हवी’

देशात करोनाची दैनंदिन रुग्णवाढ आणि बळींच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. देशभरात मंगळवारी १६,५०० रुग्णांची नोंद झाली. देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या २,६८,५८१ आहे. इतर देशांच्या तुलनेत आपली स्थिती चांगली असली तरी नव्या करोनामुळे आपण आणखी खबरदारी घ्यायला हवी, असे मत निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही. के. पॉल यांनी व्यक्त केले.

विमानसेवा निर्बंधांना मुदतवाढ?

भारत-ब्रिटन विमानसेवेवरील निर्बंधास मुदतवाढ देण्याचे संकेत हवाई वाहतूकमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी मंगळवारी दिले. नवकरोना रोखण्यासाठी सरकारने २३ डिसेंबरपासून ३१ डिसेंबपर्यंत भारत-ब्रिटन विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यास मुदतवाढ देण्यात येईल, असे चित्र आहे. याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.