कर्नाटकातील चिक्काबल्लापूर जिल्ह्यात मंगळवारी जिलेटिनच्या कांड्यांचा स्फोट होऊन भीषण दुर्घटना झाली आहे. यात सहा जणांचा मृत्यू आणि एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. उत्खनन करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या जिलेटिनच्या कांड्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करीत असताना हा स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शोक व्यक्त केला आहे.

स्फोटात मृत आणि जखमी झालेल्या व्यक्तींनी जिलेटिनच्या कांड्या बेकायदेशीरपणे साठा केला होता. पोलिसांच्या छापाच्या भीतीने त्यांनी जिलेटिनच्या कांड्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच हा स्फोट झाला.

स्फोटानंतर चिक्काबल्लापुरचे जिल्हा प्रभारी डॉ. के सुधाकर यांनी घटनास्थळाला भेट दिली. “ही एक धक्कादायक घटना आहे. ही सर्व स्फोटकं बेकायदेशीरपणे साठा करून ठेवली होती. या संदर्भात कठोर कारवाई केली जाईल,” असं आश्वासन यावेळी त्यांनी दिलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. मोदींनी ट्विट केलं असून ते म्हणाले आहेत की, “कर्नाटकातील चिक्काबल्लापूर येथे झालेल्या दुर्घटनेत जीवितहानी झाली असून त्यांच्या कुटुंबियांना सहानुभूती मिळो. जखमी झालेले लोक लवकर बरे होवोत अशी मी प्रार्थना करतो”.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. “जिलेटिनच्या स्फोटांमुळे चिक्काबल्लापूर गावात हिरेनागावल्ली गावाजवळ सहा जणांचा मृत्यू झाला असून ही धक्कादायक बाब आहे. जिल्हा प्रभारी मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची कसून चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत,” अशी माहिती त्यांनी दिली आहे.