काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील एका शियाबहुल भागात गुरुवारी पर्शियन नववर्षांचा उत्सव साजरा होत असतानाच झालेल्या स्फोटांत किमान ६ जण ठार झाले. या युद्धग्रस्त शहरातील हिंसाचाराची ही सगळ्यात अलीकडची घटना आहे.

काबूलमध्ये आज झालेल्या स्फोटांमध्ये २३ लोक जखमी झाले, तर सहा जण मारले गेले, असे आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते वहिदुल्ला मायर यांनी सांगितले. अंतर्गत मंत्रालयानेही बळीसंख्येला दुजोरा दिला.

रिमोट कंट्रोलवरील तीन सुरुंगांच्या साहाय्याने हे स्फोट घडवून आणल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यापैकी एक मशिदीच्या स्वच्छतागृहात, दुसरा एका रुग्णालयामागे, तर तिसरा एका विजेच्या मीटरमध्ये दडवून ठेवण्यात आला होता. वृत्तसंस्थेला पाठवलेल्या संदेशात तालिबानने हा हल्ला केल्याचे नाकारले.

हे स्फोट काबूल विद्यापीठाजवळ आणि कारते साखी दग्र्याजवळ झाले. पारशींचा पारंपरिक नववर्ष दिन असलेला ‘नवरोझ’ साजरा करण्यासाठी अनेक अफगाणी लोक दरवर्षी या दग्र्याजवळ गोळा होतात. मुस्लीम मूलतत्त्ववादी मात्र हा सण इस्लामविरोधी मानतात.

आम्हा सर्वाना एकत्र बांधून ठेवणारा हा पवित्र दिवस आम्ही साजरा करत असतानाच काबूलमध्ये आमच्या काही नागरिकांना आणखी एक विध्वंसक दिवस अनुभवाला आला, असे अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ गनी यांनी ट्विटरवर लिहिले.

भेकड शत्रूने आमच्या शांतताप्रेमी नागरिकांचा जीव घेतला असून, त्यांच्या क्रूरतेच्या काही सीमा नाहीत, असे काबूल पोलिसांचे प्रवक्ते बशीर मुजाहिद म्हणाले. काबूल विद्यापीठानजिकचा चौथा सुरुंग पोलिसांनी निकामी केला असून, या भागात आणखी सुरुंग पेरले आहेत का, याचा ते शोध घेत आहेत.