उत्तर प्रदेशात कानपूर येथे तबलीगच्या करोना संसर्गित व्यक्तींनी भेट  दिलेली सहा ठिकाणे रेड झोन जाहीर करण्यात आली आहेत. तबलीगच्या सहा जणांनी दिल्लीतील कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यात दोन परदेशी नागरिकांचा समावेश होता. त्यांनी कानपूरमध्ये अनेक ठिकाणी भेटी दिल्यानंतर त्यांच्या चाचण्या आता पॉझिटिव्ह आल्या आहेत. जिल्हा दंडाधिकारी ब्रह्मदेव राम तिवारी यांनी सांगितले, की चमनगंजची हलीम मशीद, कर्नलगंजची हुमायून मशीद, बाबुपुरवाची सुफा मशीद, बारीपालची बडी मशीद, घाटमपूरची नौबास्ता मशीद येथे त्यांनी भेट दिली होती. हे सर्व भाग आता रेड झोन जाहीर करण्यात आले आहेत. आता तेथे पोलिसांनी ड्रोन पाठवले असून लोकांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.

लोकांना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. तबलीग जमातच्या सदस्यांनी जेथे भेट दिली त्या ठिकाणांच्या एक कि.मी. त्रिज्येचे परिसर रेड झोन करण्यात आले असून कानपूरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी अशोक शुक्ला यांनी सांगितले, की दिल्लीतील तबलीग जमातच्या कार्यक्रमासाठी गेलेले ३१ जण येथे परत आले आहेत. यातील २२ जणांना लाला लजपत राय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील सहा जणांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. नऊ जणांना उर्सुला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिल्लीतील कार्यक्रमाहून परतलेल्या लोकांनी स्वत:हून ओळख जाहीर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या लोकांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.

गुजरातमध्ये दहा रुग्ण

गुजरातेत करोना रुग्णांची संख्या आता १२२ झाली असून १४ नवीन रुग्ण रविवारी सापडले आहेत. त्यातील दहा जणांचा संबंध दिल्लीतील निजामुद्दीनच्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाशी आहे. दरम्यान गुजरातेत करोनाने आणखी एक बळीही घेतला आहे. राज्यात ६१ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला असून तिला शनिवारी सुरत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिला मधुमेहाचा विकारही होता. रविवारी १४ नवीन रुग्ण सापडले असून त्यातील आठ अहमदाबादचे आहेत, तर प्रत्येकी दोन सुरत व भावनगरचे आहेत. वडोदरा व छोटा उदेपूरचा प्रत्येकी एकजण आहे. नवीन रुग्णात दहाजणांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे तबलिगशी संबंध आहे. सुरत येथे ज्या महिलेचा मृत्यू झाला तिची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. (करोना)  विषाणूने घेतलेल्या बळींची संख्या गुजरातेत ११ झाली आहे. अहमदाबाद पाच, भावनगर व सुरत प्रत्येकी दोन, पंचमहाल व वडोदरा प्रत्येकी एक या प्रमाणे मृतांची संख्या आहे. अहमदाबाद येथे रुग्णांची संख्या जास्त आहे.  अहमदाबाद ५३, सुरत १५, गांधीनगर १२, भावनगर ११, राजकोट व वडोदरा प्रत्येकी दहा,  पोरबंदर ३, गीर सोमनाथ दोन, कच्छ, मेहसाणा, पंचमहाल, पाटण, छोटा उदेपूर  प्रत्येकी एक या प्रमाणे मृतांची संख्या आहे.