संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून देशात अमली पदार्थ विकणाऱ्या मेक्सिकन टोळीला पेरू पोलिसांनी जेरबंद केले. या वेळी त्यांच्याकडून विक्रमी सहा टन इतके कोकेन जप्त करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
त्रुजिलो शहरातील एका कोळशाने भरलेल्या वाहनांमध्ये कोकेन लपवण्यात आले होते. ते स्पेन आणि बेल्जियम या देशांत नेण्यात येणार होते. कोकेनची ८५ टक्के इतकी मोजदाद पूर्ण झाली आहे आणि हे कोकेन आतापर्यंत सहा टनांपर्यंत भरले असल्याचे जनरल विसेन्ट रोमेरो यांनी सांगितले. रोमेरो हे पेरूमधील बेकायदा अमली पदार्थ विकणाऱ्या संघटनांच्या विरोधात लढत आहेत. या प्रकरणी आजवर दोन मेक्सिकन आणि पेरूच्या सात नागरिकांना अटक करण्यात आली आहे. ही मोहीम सहा आठवडे चालली होती. पेरूमध्ये आजवर पकडण्यात आलेल्या अमली पदार्थाच्या साठय़ापैकी विक्रमी साठा असल्याचे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले.