वॉशिंग्टन : अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठीच्या निधीसाठी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केल्यामुळे त्यांच्यावर अमेरिकेतील सोळा राज्यांनी त्यांच्यावर न्यायालयात दावा दाखल केला आहे.  स्वत:च्याच कृत्यांनी देशाला घटनात्मक संकटात टाकल्याचा आरोप त्यांच्यावर या राज्यांनी केला आहे.

ट्रम्प यांनी शुक्रवारी मेक्सिको सीमेवरही भिंत बांधण्यासाठी कोटय़वधी डॉलर्स खर्च करण्याचे जाहीर करून आणीबाणी घोषित केली. काँग्रेसने त्यांच्या या प्रस्तावासाठी काही रक्कम मंजूर केली असली तरी त्यांना जास्त रक्कम अपेक्षित होती. त्याच मुद्दय़ावर अमेरिकेत वर्षांच्या सुरुवातीला टाळेबंदीही झाली होती.

राष्ट्रीय आणीबाणी कायद्यानुसार अध्यक्षांना आणीबाणी जाहीर करून काही वैधानिक अधिकारान्वये निधी खुला करण्याचा अधिकार आहे. त्यावर सोळा राज्यांनी दाखल केलेल्या दाव्यात म्हटले आहे, की ट्रम्प यांनी आणीबाणी जाहीर करून निधी मिळवणे हे घटनाबाह्य़ व बेकायदेशीर आहे.

या  राज्यांनी ट्रम्प यांच्यावर दावा दाखल केला आहे. सॅनफ्रान्सिस्को संघराज्याने जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यात म्हटले आहे, की मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी निधी वळवण्याचा अध्यक्षांना अधिकार नाही, कारण खर्चावर काँग्रेसचे नियंत्रण असते. अध्यक्ष ट्रम्प यांनी देशाला घटनात्मक पेचप्रसंगात ढकलले असून, गेली  काही वर्षे ते मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्याचा प्रस्ताव मांडत आले आहेत.