उत्तर प्रदेशातील एका रुग्णालयात २४ वर्षांपासून बंद असलेली लिफ्ट उघडण्यात आली आणि सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. बस्ती जिल्ह्यातील ओपीईसी रुग्णालयातील ही लिफ्ट गेल्या २४ वर्षांपासून बंद होती. दुरुस्तीसाठी लिफ्ट उघडण्यात आली असता आतमध्ये चक्क एका पुरुषाच्या हाडांचा सांगाडा सापडला. यानंतर एकच खळबळ माजली. १ सप्टेंबरला ही घटना घडली असल्याचं वृत्त युपी तकने दिलं आहे.

पोलीस आणि फॉरेन्सिक विभागा आता या सांगाड्याचं गूढ उकलण्याचा प्रयत्न करत आहेत. डीएनए चाचणीसाठी हा मानवी सांगाडा पाठवण्यात आला आहे.

५०० बेड्सच्या या ओपीईसी रुग्णालयाचं बांधकाम १९९१ मध्ये सुरु झालं होतं. १९९७ पर्यंत ही लिफ्ट सुरु होती, त्यानंतर बंद पडली असं पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रकऱणी काही धागेदोरे सापडतात हे पाहण्यासाठी पोलीस २४ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या तक्रारींची माहिती घेत आहे. या मृतदेहाची ओळख पटवणं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.

नेमकं गूढ काय?

सध्याच्या घडीला ही व्यक्ती कोण आहे, त्याचा मृत्यू कसा झाला आणि हा मृतदेह लिफ्टमध्ये कसा काय पोहोचला याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. ही व्यक्ती लिफ्टमध्येच अडकून श्वास कोंडल्यामुळे मृत्यू झाला की कोणी हत्या करुन मृतदेह इथे आणून टाकला याची माहिती पोलीस घेत आहेत. डीएनए रिपोर्ट आल्यानंतरच तपासाला गती येईल.

“जर कोणी लिखीत तक्रार दिली तर आम्ही गुन्हा दाखल करु. पण सध्या आम्ही याप्रकरणी सर्व बाजूंनी तपास करत आहोत. हे गूढ उकलण्यासाठी २४ पोलीस स्थानकं काम करत आहेत,” अशी माहिती बस्तीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीपेंद्र नाथ चौधरी यांनी दिली आहे.