पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी एक लाखाहून अधिक करोना योद्ध्यांच्या कौशल्यविकासाच्या उद्देशाने एक अभ्यासक्रम जाहीर केला. करोनाचा धोका आणि त्याच्या उत्परिवर्तनाची शक्यता अद्यापही कायम असल्याने देशाला सज्ज राहणे गरजेचे आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हा विषाणू कोणती आव्हाने उभी करू शकतो ते अधोरेखित झाले आहे. त्यामुळे एक लाखाहून अधिक करोना योद्ध्यांना प्रशिक्षण देणे हे त्या दृष्टिकोनातून टाकलेले पाऊल आहे. भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी देशाने अधिक सज्ज राहिले पाहिजे, असेही ते म्हणाले.

प्रत्येकाला विनामूल्य लस उपलब्ध करून देण्यास केंद्र सरकार बांधील आहे. २१ जूनपासून लसीकरण सुरू होत आहे. करोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली तेव्हा आपल्याला वैद्यकीय प्राणवायूचा तुटवडा जाणवला. त्यामुळे १५०० हून अधिक प्राणवायू प्रकल्प स्थापन करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत, असेही मोदी म्हणाले.

देशातील २६ राज्यांमधील १११ केंद्रांवरून या अभ्यासक्रमाची सुरुवात केली जाणार असून त्याची रूपरेषा तज्ज्ञांनी आखली आहे. करोनाने कौशल्यविकासाचे महत्त्व अधोरेखित केले आहे, असेही ते म्हणाले. पंतप्रधान कौशल्यविकास योजनेअंतर्गत हा विशेष कार्यक्रम आहे.

योजनेचे सहा पैलू

पंतप्रधान पुढे म्हणाले की, या खास अभ्यासक्रमात सहा प्रकारे काळजी घेण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामध्ये घरी घ्यावयाची काळजी, मूलभूत काळजी, आगाऊ काळजी, आपत्कालीन काळजी, नमुने गोळा करण्याबाबत घ्यावयाची काळजी आणि वैद्यकीय उपकरणांबाबतची काळजी यांचा समावेश आहे.