नियमित योगासन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रसिद्ध आहेत. काहीही होवो पंतप्रधान मोदी हे सकाळी योगासन करायचे टाळत नाहीत. पण आज (मंगळवारी) त्यांनी आपल्याच नियमाला छेद दिला आहे. सध्या गुजरात दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी यांनी सकाळी लवकरच योगासन करण्याचे टाळून आपल्या आई हिराबा यांची भेट घेतली व त्यांच्याबरोबर नाश्ताही केला. खुद्द पंतप्रधानांनीच याची ट्विट करून माहिती दिली. दरम्यान, आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मात्र पंतप्रधानांच्या या ट्विटवर टीका केली आहे. मी आईबरोबर राहतो. दररोज  तिचे आशीर्वाद घेतो. पण मी हे ओरडून सांगत नाही. राजकारणासाठी याचा उपयोग करत नाही, असे ट्विट त्यांनी केले आहे.

‘आज मी योगासन न करताच आईला भेटायला गेलो. सकाळ होण्यापूर्वी आईबरोबर नाश्ता केला. आईबरोबर वेळ व्यतीत केल्यामुळे खूप बरं वाटत आहे. ते चांगले क्षण होते,’ असे ट्विट त्यांनी केले आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या आई हिराबा या गांधीनगर येथे राहतात. त्या ९५ वर्षांच्या आहेत. पंतप्रधान मोदींचे सर्वात लहान भाऊ पंकज मोदी यांच्याकडे त्या राहतात. यापूर्वीही गुजरात दौऱ्यावर असताना पंतप्रधान मोदींनी आईला भेटण्याची एकही संधी दवडलेली नाही. ज्या-ज्या वेळी ते गुजरातमध्ये जातात. त्यावेळी ते आईचे आशीर्वाद घेण्यास सर्वात प्रथम जातात.

पंतप्रधान मोदी हे आपल्या प्रत्येक वाढदिवसानिमित्त गांधीनगर येथे जाऊन आई हिराबा यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतात. गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून वर्षानुवर्षे ते ही प्रथा सांभाळत आहेत. यंदाही त्यांनी आपला ६६ वा वाढदिवस आई हिराबा यांच्याबरोबर साजरा केला. या प्रसंगी त्यांनी आई हिराबासोबत काही वेळ घालवला होता.

पंतप्रधान मोदी हे सोमवारपासून गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी गांधीनगर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामाचे भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झाले. तसेच व्हायब्रंट गुजरात ट्रेड शो, जीआयएफटी शहरात आंतरराष्ट्रीय देवाण-घेवाण आणि अहमदाबाद येथील सायन्स सिटीत नोबेल पुरस्कार प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले.