पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी भारत आणि चिनी सैन्य अधिकाऱ्यांमध्ये आज दुसऱ्या फेरीची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीआधी चारपैकी तीन ठिकाणाहून भारत आणि चीन दोघांनी आपआपल्या सैन्य तुकडया थोडया मागे घेतल्या आहेत. या चार ठिकाणी भारत आणि चीनचे सैनिक आमने-सामने उभे ठाकले आहेत.

बैठकीआधी परस्पर विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. शनिवारी लेफ्टनंट जनरल स्तरावर पहिली बैठक झाली होती. त्यावेळी सुद्धा दोन्ही देशांचे सैन्य थोडे मागे हटले होते. तीन ठिकाणाहून सैन्य मागे घेतले असले तरी पँगाँग टीएसओ तलावाच्या उत्तरेला परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. हाच भाग संघर्षाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. दोन्ही बाजूंकडून तिथे कुठलीही हालचाल झालेली नाही.

मे महिन्यापासून भारतीय सैन्याची गस्त बंद करण्यासाठी चिनी सैन्याने फिंगर ४ टू फिंगर ८ या भागावर नियंत्रण मिळवले आहे.  ६ जून रोजी झालेली चर्चा आणि पुढील काही दिवसांत होणारी चर्चा लक्षात घेत चीनने गालवान व्हॅली, पीपी-१५ आणि हॉट स्प्रिंग्स येथून आपलं सैन्य दोन ते अडीच किमी मागे घेतलं असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. चीनने सैन्य मागे घेतलं असल्याने भारतानेही आपलं काही सैन्य आणि वाहने या परिसरांमधून मागे हटवली आहेत.

चीन बरोबर सुरु असलेल्या या वादामध्ये लगेच काही निष्पन्न होणार नाही. दोन्ही देशांमध्ये लगेच कुठला शांतता करार होणार नाही. ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. भारतही त्यासाठी तयार आहे. शनिवारी दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेली प्रदीर्घ चर्चा हे त्या दिशेने उचललेले सकारात्मक पाऊल आहे.

चीनला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी भारताने लडाखमधील उंचावरील या युद्ध क्षेत्रामध्ये अतिरिक्त सैन्य तुकडया आणि शस्त्रास्त्र तैनात केली आहेत. एप्रिलच्या मध्यापर्यंत या भागामध्ये नियंत्रण रेषेवर जी स्थिती होती, तीच पूर्ववत करण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरु आहेत. शनिवारच्या बैठकीत दोन्ही देशांनी सीमेवर शांतता राखून चर्चेच्या माध्यमातून वादावर तोडगा काढायचं ठरवलं आहे.