सार्वजनिक तेल कंपन्यांचे संकेत
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात येत्या आठवडाभरात नव्याने किंचीत वाढ होण्याचे संकेत सार्वजनिक तेल कंपन्यांनी बुधवारी दिले. आठवडाअखेरीस पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर एक रुपया तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर पन्नास पैशांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
पेट्रोलचे दर यापूर्वीच सरकारच्या नियंत्रणातून मुक्त झाले असून डिझेलच्या दरांतही हेच धोरण टप्प्याटप्प्याने राबविण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत होणाऱ्या चढ-उतारानुसार देशांतर्गत दर ठरविण्याचे अधिकार सार्वजनिक तेल कंपन्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार ही दरवाढ होणार आहे.
‘आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या दोन आठवडय़ात पेट्रोलच्या दरात लक्षणीय वाढ झाल्याने सार्वजनिक तेल कंपन्यांना प्रतिलिटर एक रुपया ३२ पैसे तोटा सोसावा लागत आहे. दुसरीकडे डिझेलवरील सवलतीमुळे तसेच वाढत्या किंमतीमुळे डिझेल कंपन्यांना प्रतिलिटर नऊ रुपये २२ पैशांचा तोटा सहन करावा लागत आहे. आमच्या कंपन्या दर पंधरा दिवसांनी इंधनाच्या प्रचलित दरांचा व त्यांच्या आंतरराष्ट्रीय दरांचा आढावा घेतात, येत्या १५ तारखेला होणाऱ्या या आढाव्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे एक रुपया व ५० पैशांनी वाढ होण्याची शक्यता आहे’, अशी माहिती इंडियन ऑईलचे प्रमुख आर. एस. बुटोला यांनी दिली.
पेट्रोलच्या दरात यापूर्वी १८ जानेवारीला बदल झाले होते, त्यावेळी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ३० पैशांनी कपात करण्यात आली होती.