बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सध्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. यावेळी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली जात असून काही घटनाही समोर येत आहेत. असाच एक प्रकार समोर आला असून राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यावर चप्पल फेकण्यात आली. बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यात तेजस्वी यादव काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारसभेसाठी उपस्थित असताना त्यांच्यावर चपलीने हल्लाच करण्यात आला.

घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. व्हिडीओत एक चप्पल तेजस्वी यादव यांच्या बाजूने निघून जाते तर दुसरी चप्पल त्यांना लागताना दिसत आहे.

तेजस्वी यादव प्रचारसभेसाठी हजर राहिले होते. तेजस्वी यादव मंचावर पोहोचताच त्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली आणि काही वेळातच हा प्रकार घडला. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, एका दिव्यांग व्यक्तीने या चपला फेकल्याची माहिती मिळत आहे. घटनेनंतर सुरक्षा रक्षकांनी तात्काळ त्या व्यक्तीला सभेतून बाहेर काढलं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

घटनेचा कोणताही परिणाम तेजस्वी यादव यांनी प्रचारावर होऊ दिला नाही. कारण त्यानंतर झालेल्या भाषणात तेजस्वी यादव यांनी त्याचा उल्लेखही केला नाही. आरजेडी प्रवक्ता मृत्यूंजय तिवारी यांनी घटनेचा निषेध केला असून योग्य सुरक्षा दिली जावी अशी मागणी केली आहे.