पश्चिम बंगालच्या उत्तरेकडील भागातील सिलिगुडीपासून अवघ्या सात किलोमीटर अंतरवर असणाऱ्या तोरीबारी गाव २२ मार्चपासून पूर्णपणे लॉकडाउनमध्येच आहे. जलपायगुरीमधील महानंदा अभयारण्याच्या बाजूला असणाऱ्या या गावातील लोकांनी देशभरामध्ये लॉकडाउन जारी करण्याच्या आधी म्हणजेच २४ मार्चच्याही दोन दिवसआधीपासूनच लॉकडाउनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच या गावामध्ये करोनाचा एकही रुग्ण नाहीय.

तोरीबारीमध्ये एकूण ९४ घरं आहेत. या गावामध्ये २२ मार्चपासून बाहेरील लोकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजेच अभयारण्याच्या सीमेजवळ असणारं हे गाव करोना साथीच्या आधी पर्यटकांनी गजबजलेलं असायचं. मात्र करोनाचा फैलाव होऊ नये म्हणून गावकऱ्यांना बाहेरच्या लोकांना प्रवेश करु न देण्याचा निर्णय घेतला. राज्यामध्ये करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच गावकऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे तोरीबारीमध्ये एकही करोना रुग्ण आढळून आलेला नाही याचे गावकऱ्यांना समाधान आहे. मात्र अशाप्रकारे करोनाचा एकही रुग्ण न सापडलेले हे राज्यातील एकमेव गाव आहे का यासंदर्भात सरकारी अधिकाऱ्यांकडेही ठोस आकडेवारी उपलब्ध नसल्याचे हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

आपातकालीन परिस्थितीमध्येच मदतीसाठी या गावामध्ये बाहेरील व्यक्तीला प्रवेश दिला जातो. मात्र या व्यक्तीलाही पूर्णपणे सॅनिटाइज केल्यानंतरच प्रवेश दिला जात आहे. गावातील विकास समितीचा अध्यक्ष असणाऱ्या युडेन लेपचा यांनी गावाला अधिक सावध राहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केलं आहे. “या गावामध्ये मंदिर आहे, चर्च आहे आणि मठही आहे. सिलिगुडीमध्ये राहणाऱ्यांसाठी आमचे गाव म्हणजे एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. त्यामुळेच आम्हाला जास्त सावध राहण्याची गरज आहे,” असं लेपचा यांनी म्हटलं आहे. “काही आठवड्यांपूर्वी सरकारने अनलॉकला सुरुवात केली असली तरी गावकऱ्यांनी लॉकडाउन सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गावाच्या सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी समितीने काही लोकांची नेमणूक केली आहे,” अशी माहिती जंगल व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष असणारे गावातील स्थानिक सुदीप प्रधान यांनी दिली. “गावाच्या सीमांजवळ नियुक्त करण्यात आलेल्या सुरक्षारक्षकांशी काही जणांनी वाद घातल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. यासंदर्भात माहिती मिळताच गावातील वरिष्ठ मंडळींनी घटनास्थळी धाव घेऊन वाद मिटवला. परिस्थिती सामान्य झाल्यानंतर आम्ही पर्यटकांना पुन्हा गावात प्रवेश देऊ,” असं प्रधान यांनी स्पष्ट केलं आहे.

९ ऑगस्टपर्यंत दार्जिलींगमध्ये ३९ तर जलपायगुरी जिल्ह्यामध्ये १४ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी सर्वाधिक रुग्ण हे सिलिगुडी उप विभाग आणि सिलिगुडी महानगरपालिका क्षेत्रात आढळून आले आहेत.