News Flash

मायावती गोत्यात, स्मारक घोटाळ्याप्रकरणी ईडीचा छापा

तब्बल १,४०० कोटी रुपयांचा हा आर्थिक घोटाळा असल्याचा ठपका २०१३ मध्ये लोकायुक्तांनी ठेवला होता.

मायावती (संग्रहित)

उत्तर प्रदेशमधील स्मारक घोटाळ्याप्रकरणी बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) या घोटाळ्याप्रकरणी गुरुवारी सहा ठिकाणी छापा टाकला आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई झाल्याने उत्तर प्रदेशमधील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये मायावती मुख्यमंत्रीपदी असताना स्मारके आणि उद्याने उभारताना आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. राज्यात विविध स्मारके स्मृतिउद्याने उभारण्यासाठी करण्यात आलेल्या आर्थिक तरतुदींच्या ३४ टक्के म्हणजे तब्बल १,४०० कोटी रुपयांचा हा आर्थिक घोटाळा असल्याचा ठपका २०१३ मध्ये लोकायुक्तांनी ठेवला होता. याप्रकरणी, १९ जणांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली तसेच भारतीय दंडविधान कायद्याच्या कलम ४०९ अन्वये प्राथमिक आरोपपत्र दाखल करण्याची शिफारस लोकायुक्तांनी केली होती.

या प्रकरणाचा ईडीकडून तपास सुरु आहे. या प्रकरणात गुरुवारी ईडीने उत्तर प्रदेशमध्ये सहा ठिकाणी छापा टाकला. या कारवाईवर बसपाकडून प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, या कारवाईमुळे उत्तर प्रदेशमधील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी सीबीआयने अखिलेश यादव यांच्यावरही कारवाई केली होती. अवैध खाणकामाप्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती. तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री कार्यालयाने एकाच दिवशी १३ खाणकाम प्रकल्पांना मंजुरी दिली आणि यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. ईडीनेही याप्रकरणी अखिलेश यादव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.
उत्तर प्रदेशमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष एकत्र आले आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांच्या प्रमुखांच्या मागे चौकशीचा ससेमिरा सुरु झाल्याचा आरोप दोन्ही पक्षांचे नेते करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2019 2:36 pm

Web Title: smarak scam set back to mayawati ed searches at six places in uttar pradesh
Next Stories
1 …म्हणून ६०० भारतीय विद्यार्थी अमेरिकन पोलिसांच्या ताब्यात
2 Jind Bypoll: भाजपा आघाडीवर, काँग्रेस म्हणते, हा तर ईव्हीएम घोटाळा
3 परीक्षा पाहू नका, हिंदूंचा संयम कधीही सुटू शकतो- केंद्रीय मंत्री
Just Now!
X