लिनोव्होचा झेड २ प्लस हा स्मार्टफोन भारतामध्ये लाँच झाला तेव्हा त्याची किंमत ही १७,९९९ रुपये होती. या फोनची किंमत ३,००० रुपयांनी अचानकपणे कमी केल्यामुळे ग्राहकांनी अक्षरशः इ-कॉमर्स वेबसाइटकडे धाव घेतली आहे. आज दुपारी १२ वाजेपासून लिनोव्हो झेड २ प्लस विक्रीसाठी नवीन किमतीमध्ये उपलब्ध झाला आहे. आधी हा फोन केवळ अॅमेझॉनवरच विक्रीसाठी होता परंतु आता हा फोन फ्लिपकार्टवरही उपलब्ध असणार आहे.

हा फोन दोन व्हॅरियन्ट्समध्ये उपलब्ध आहे. झेड २ प्लस ३२ जीबीच्या फोनची किंमत आधी १७,९९९ रुपये होती. आता हा फोन १४,९९९ रुपयांना उपलब्ध होणार आहे. तर, ६४ जीबीच्या फोनची किंमत १९,९९९ रुपये जाहीर करण्यात आली होती. या फोनची किंमत अडीच हजारांनी कमी करण्यात आली आहे. हा फोन १७,४९९ रुपयांना मिळणार आहे.

लिनोव्हो झेड  २ प्लसचे फीचर्स 

प्रोसेसर- २.१५ गीगाहर्ट्झ क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८२० प्रोसेसर
डिस्प्ले- ५ इंचाचा पूर्ण एचडी आयपीएस एलसीडी डिस्प्ले
व्हॅरियन्ट्स- ३ जीबी रॅम आणि ४ जीबी रॅम
इंटरनल स्टोरेज- ३ जीबी रॅम साठी ३२ जीबी, ४ जीबी रॅम साठी ६४ जीबी
कॅमेरा- रिअर १३ मेगापिक्सल, फ्रंट ८ मेगापिक्सल, फेस डिटेक्शन, इंटिलिजंट एचडीआर, स्लो मोशन, व्हिडीओ रेकॉर्डिंग फीचर्स,
सुरक्षा- फिंगरप्रिंट सेन्सर
बॅटरी- ३,५०० एमएएच क्षमतेची बॅटरी
कनेक्टिविटी- ४ जी एलटीईवाय-फाय, ११ ए/बी/जी/एन/एसीब्लूटूथ १ यूएसबी टाइप-सी पोर्ट

२२ सप्टेंबर २००१६ ला भारतात लाँच झाल्यापासूनच हा फोन चर्चेत आहेत. याचे फीचर्स आणि कामगिरी पाहता इतर कंपन्यांच्या तुलनेत लिनोव्होची किंमत कमीच होती. त्यामुळे लिनोव्होने भारतामध्ये बघता बघता बाजारपेठ काबीज केली. भारतातील सर्वाधिक विक्री झालेल्या स्मार्टफोन्समध्ये लिनोव्होचा तिसरा क्रमांक लागतो. गेल्या काही महिन्यांमध्ये लिनोव्होच्या विक्रीमध्ये घट होत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले होते. आता किंमत अचानकपणे कमी केल्यामुळे पुन्हा एकदा ग्राहकांनी लिनोव्होवर उड्या मारल्याचे दिसत आहे.  भारतीय बाजारपेठेमध्ये चीनच्या स्मार्टफोन्सचे वर्चस्व आहे. २०१६ मध्ये विक्री झालेल्या स्मार्टफोनमध्ये ४० टक्के वाटा हा चिनी कंपन्यांचा होता. शिओमी आणि लिनोव्हो या कंपन्यांचा बाजारातील हिस्सा हा मोठा असल्याचे बाजारविषयक संशोधन संस्थांनी आपल्या अहवालात म्हटले आहे.