एकमेकांशी संभाषण, व्हॉट्स अ‍ॅप चॅटिंग, फेसबुक, गेम, छायाचित्रण.. भारतीय स्मार्टफोनचा वापर सातत्याने करत असतात. स्मार्टफोन हा आता एक छंदच झाला आहे. दिवसातील बराच वेळ स्मार्टफोनचा वापर करणे भारतीयांना आवडते. एका सव्‍‌र्हेक्षणानुसार तर भारतीय लोक दिवसातील सरासरी सव्वा तीन तास स्मार्टफोनचाच वापर करत असल्याचे आढळले आहे.
या सव्वा तीन तासांपैकी एक तृतीयांश वेळ तर भारतीय विविध अ‍ॅप्सचा वापर करण्यातच घालवत असतात. गेल्या दोन वर्षांत भारतामध्ये स्मार्टफोन वापरकर्त्यांमध्ये ७६ टक्क्यांची वाढ झाली आहे. याच कार्यकाळात मोबाइल अ‍ॅप्सचा वापर करण्यामध्ये ६३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. चांगला आणि विविध गुणसंपन्न स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी भारतीयांची अधिक पैसे खर्च करण्याचीही तयारीही असते, असे ‘इरिक्सन इंडिया’ या कंपनीने तयार केलेला सव्‍‌र्हेक्षण अहवाल सांगतो.
काही भारतीयांना या सव्‍‌र्हेक्षणासाठी सहभागी करून घेण्यात आले होते. आम्ही ७७ वेळा तरी आमचा मोबाइल तपासतो, असे अनेक जणांनी सांगितले, तर २६ टक्के लोकांनी आम्ही १००पेक्षा अधिक वेळा मोबाइलचे अ‍ॅप्स किंवा विविध गोष्टी तपासतो, असे सांगितले.
* समाज माध्यमे (सोशल मीडिया) आणि चॅट अ‍ॅप्समुळे मोबाइल वापरण्यात आता मर्यादा नाही. व्हाट्स अ‍ॅप किंवा वुई चॅट यांसारख्या अ‍ॅप्समुळे अनेक जण स्मार्टफोनचा वारंवार वापर करतात. केवळ वेळ घालवण्यासाठीच नव्हे, तर व्यावसायिक कारणांसाठीही या अ‍ॅप्सचा वापर होत असल्याचे आढळले आहे.
* मोबाइलवर इंटरनेट सहज उपलब्ध होत असल्याने माहिती मिळविण्यासाठी आणि ऑनलाइन शॉपिंगसाठीही स्मार्टफोनचा मोठा वापर होत आहे.
* भारतातील १८ शहरांमधील ४००० स्मार्टफोन वापरकर्त्यांना या सव्‍‌र्हेक्षणात सहभागी करून घेतले होते.
* मोबाइलवर चित्रफिती (व्हिडीओ) पाहणे हाही भारतीयांचा एक मोठा उद्योग आहे. ४० टक्के वापरकर्त्यांनी सांगितले की ते रात्री उशिरा बिछाण्यावर चित्रफिती पाहत असतात. २५ टक्के लोक सांगतात ते भटकंती करताना, २३ टक्के जेवताना तर २० टक्के बाजारहाट करताना चित्रफिती पाहत असतात.
* १२ टक्के गृहिणींना घरी स्मार्टफोनवर चित्रफिती पाहणे आवडते. बऱ्याच जणी टीव्हीवरील कार्यक्रम मोबाइलवर पाहतात. १० टक्के लोक तर दिवस उजाडताच आध्यात्मिक व्हिडीओ पाहणे पसंत करतात.
* कार्यालयामध्ये काम असते, त्यामुळे घरी आणि प्रवासातच स्मार्टफोनचा अधिक वापर होतो. ६८ टक्के लोक घरीच स्मार्टफोनचा अधिक वापर करतात.

भारत हा जगातील सर्वाधिक स्मार्टफोनचा वापर करणारा देश आहे. भारतात सरसरी १३२ मिनिटे (दोन तास १२ मिनिटे) स्मार्टफोनचा वापर केला जातो. आशियातील अन्य देशांमध्ये हेच प्रमाण ४० ते ५० मिनिटे आहे.
-अजय गुप्ता, उपाध्यक्ष, इरिक्सन इंडिया.