बीएसएनएलच्या ४६ कर्मचाऱ्यांविरोधातील खटला मद्रास उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. सहकारी महिलेने पाठवलेल्या एका व्हॉट्सअॅपच्या व्हिडीओ मेसेजला उत्तर म्हणून एका पाठोपाठ एक इमोजी पाठवल्याची त्यांच्याविरोधात तक्रार होती. इमोजी स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी पाठवण्यात आले होते, त्यामुळे एखाद्याच्या विरोधात केलेली कृती म्हणून याकडे पाहिलं जाऊ शकत नाही असं कोर्टाने स्पष्ट केलं आहे.

स्वतःच्या भावना व्यक्त करणे हा प्रत्येकाचा हक्क आहे असं न्यायमूर्ती एसएस सुंदर यांनी म्हटलं. पण त्यासोबतच त्यांनी महिलेला त्रास झाल्याबद्दल आरोपी कर्मचाऱ्यांना दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितलं. पण कोणताही गुन्हा घडला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं
तूतीकोरिन येथे बीएसएनएलमध्ये डिव्हिजन इंजिनिअर असलेल्या विजयलक्ष्मी यांनी कार्यालयाच्या अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुपवर एक व्हिडिओ क्लिप पाठवली होती. या क्लिपमध्ये ग्राहक कंपनीबाबत मत व्यक्त करत होते. विजयलक्ष्मी यांनी पाठवलेल्या या व्हिडीओला उत्तर देताना ग्रुपमधील काही सदस्यांनी हसत-हसत रडणारे इमोजी पाठवले. त्यामुळे विजयलक्ष्मी यांना वाईट वाटलं होतं. त्यानंतर त्यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार पोलिसांनी ४६ कर्मचाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल केला होता.

इमोजी स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी पाठवण्यात आले होते, स्वतःच्या भावना व्यक्त करणे हा प्रत्येकाचा हक्क आहे. पण ग्रुपचं ध्येय वाढावं यासाठी स्थापन केलेल्या ग्रुपमध्ये कर्मचाऱ्यांनी अशाप्रकारे इमोजी पाठवायला नको होते, असं न्यायालयाने म्हटलं. महिलेला वाईट वाटलं म्हणून तिची दिलगिरी मागावी असं न्यायालयाने सांगितलं, पण कोणताही गुन्हा घडला नसल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं.