म्यानमारमध्ये आँग सान स्यु ची यांच्या लोकशाहीवादी पक्षाने सत्ता संपादन केल्यानंतर आता सत्तेच्या हस्तांतराबाबत साशंकता व्यक्त होत आहे. निवडणुकीत हरलेले व जिंकलेले सगळेच संसदेत परतले आहेत. स्यु ची यांना घटनात्मक तरतुदीनुसार देशाच्या पुढील अध्यक्ष होता येणार नाही, पण अध्यक्षाच्याही वरच्या अशा पातळीवरून त्या सत्ता चालवू शकतात असा एक मतप्रवाह आहे.
८ नोव्हेंबरला झालेल्या निवडणुकीत नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी या पक्षाने विजय मिळवला होता, पण आता नवीन सदस्यांनी स्थानग्रहण करण्यास महिन्याचा अवधी असताना लष्करी राजवट नवीन राजकीय क्लृप्त्या करीत आहे. हे सत्तेचे हस्तांतर साधे, सरळ होईल असे वाटत नसल्याचे एनएलडीचे प्रवक्ते विन टेन यांनी सांगितले. या वेळी आम्ही निर्विवाद जिंकलो असलो तरी इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते अशी भीती व्यक्त करताना त्यांनी सांगितले, की १९९० मध्ये आम्ही असाच विजय मिळवला होता, पण तेव्हाही सत्ताधारी लष्करी राजवटीने त्याकडे दुर्लक्ष केले होते. नंतर दोन दशके ते सत्तेला चिकटून राहिले व बंडखोरांच्या नाडय़ा आवळत राहिले.
पक्षनेत्या आँग सान स्यु ची यांच्याभोवती पत्रकारांनी त्या संसदेत येताच गराडा घातला, पण त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला व विजयाचा कुठलाच उत्साह चेहऱ्यावर दाखवला नाही. त्यांच्या एनएलडी पक्षाला या वेळी ८० टक्के जागा मिळाल्या आहेत.