स्मृती इराणींनी मदत केली नसल्याचा आरोप

केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या वाहनांच्या ताफ्याला यमुना द्रुतगती महामार्गावरील झालेल्या अपघातात मरण पावलेल्याच्या कुटुंबीयांनी, इराणी यांच्याकडे हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी मदतीची याचना केली असतानाही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. या अपघातात डॉ. रमेश नागर ठार झाले, त्यांची कन्या संदाली (१३) हिने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी इराणी यांच्याकडे मदतीची याचना केली होती. त्यांनी मदत केली असती, तर माझे वडील वाचले असते, असे तिने सांगितले. इराणी यांनी मात्र आरोप फेटाळले आहेत. जखमींना आपण मदत करण्याची तयारी दर्शविली होती आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो, असे सांगितले होते. यावरून इराणी आणि संदाली यांच्या जबाबात परस्परविरोध असल्याचे स्पष्ट होते.

जवळपास ८.३० वाजण्याच्या सुमाराला आमच्या दुचाकीला एका मोटारीने धडक दिली, ही मोटार इराणी यांच्या ताफ्यातील होती. त्यानंतर इराणी गाडीतून उतरल्या तेव्हा आम्ही त्यांच्याकडे मदतीची याचना केली, तेव्हा वडील शुद्धीत होते, इराणी यांनी मदत केली असती तर कदाचित आपले वडील जिवंत राहिले असते, असे संदाली हिने ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले. एका वाटसरूने पोलिसांना पाचारण केले आणि त्यांनी आम्हाला मथुरा जिल्हा रुग्णालयात नेले, असेही संदालीने सांगितले. इराणी यांच्या ताफ्यातील वाहनाला आदळून डॉ. नागर मृत्युमुखी पडले, तर त्यांची मुलगी संदाली व पुतण्या पंकज जखमी झाले होते. मंत्र्यांनी जखमींना मदत देण्याचे निर्देश दिले होते, असा दावा स्मृती इराणी यांच्या कार्यालयातून करण्यात आला.