दुर्गेबाबत पत्रकातील मजकुरावरून गदारोळ; कामकाज तहकूब
रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण तसेच जेएनयूच्या मुद्दय़ावरून गुरुवारी राज्यसभेत खडाजंगी झाली. बुधवारी लोकसभेत सरकारची बाजू आक्रमकपणे मांडणाऱ्या मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी राज्यसभेतही तुलनेत काहीशा सौम्यपणे प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिले. दुर्गेबाबतच्या पत्रकातील उल्लेखाने स्मृती इराणींनी दिलेल्या स्पष्टीकरणावर गदारोळ झाल्याने राज्यसभेचे कामकाज उशिरा तहकूब करावे लागले. हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुला याच्या आईशी संवाद साधल्याचे स्मृती इराणींनी स्पष्ट केले. मात्र ही बाब माध्यमांपुढे उघड केली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अनेक जण माझ्या शैक्षणिक पात्रतेवरून उल्लेख अशिक्षित मंत्री असा करतात, मात्र त्यांना घाबरत नाही असे त्यांनी ठणकावले. सरकार विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकांनी चर्चेत केला. त्यालाही उत्तर दिले. जेएनयूतील विद्यार्थ्यांनी दुर्गामातेबाबत वादग्रस्त पत्रकाचे वर्णन करताना विरोधी सदस्यांनी आक्षेप घेतल्याने गदारोळ झाला. काँग्रेसच्या आनंद शर्मा यांनी आक्षेप घेत मंत्र्यांच्या वक्तव्याने चुकीचा पायंडा पडेल असा दाखला दिला. मात्र आरोपांना उत्तर देण्यासाठी ही उदाहरणे देणे गरजेचे आहे असे स्मृती इराणींनी सांगितल्याने वाद वाढला. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद व माकपचे सीताराम येचुरी यांच्याशी इराणी यांची अनेक वेळा शाब्दिक चकमकही घडली. सीताराम येचुरी यांनी रोहित वेमुलाच्या फेसबुक पोस्टचा दाखला दिला होता. त्यावर स्मृती इराणींनी रोहितच्या दुसऱ्या पोस्टचा संदर्भ देत त्याने डाव्यांची विद्यार्थी संघटना असलेल्या एसएफआयवर दलित विरुद्ध दलित असा वाद लावत असल्याची टीका केली होती. संघ व भाजपवर विद्यार्थ्यांना धमकावण्याचे आरोप करणारेच केरळमध्ये अभाविपच्या कार्यकर्त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडत असल्याची टीका स्मृती इराणी यांनी केली. दिल्ली विद्यापीठात दलित शिक्षकांवर अन्याय होत असल्याची तक्रार काँग्रेसच्या पी.एल.पुनिया यांनी केली होती. त्यावर काँग्रेस सरकारच्याच काळातील ही घटना होती, उलट आम्ही मदत केली असे प्रत्युत्तर दिले.

‘पंतप्रधानांवर संघाचा प्रभाव’
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर रा. स्व. संघाचा ‘दाट प्रभाव’ असल्याचा आरोप करतानाच, असे लोक त्यांच्याभोवती असतील तर ते स्वत:चे प्रकल्प राबवू शकणार नाहीत असे काँग्रेसने म्हटले आहे.
तुमच्यावर संघाचा मोठा प्रभाव आहे. भाजप आणि प्रचारकांसाठी हे ठीक आहे, पण पंतप्रधानांसाठी मात्र योग्य नाही. संघाने गरिबांचा कधीच विचार केलेला नाही, असे लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत सांगितले. सरकारने विरोधकांशी संवाद साधावा असे आवाहन त्यांनी केले.

केंद्राने हस्तक्षेप थांबवावा-येचुरी
आपल्याविरोधात उठणारा आवाज दडपून टाकण्याचा भाजप प्रयत्न करीत असून देशावर धर्मशासित, हिंदू राष्ट्राची हुकूमशाही कल्पना लादण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप माकपचे नेते सीताराम येचुरी यांनी गुरुवारी राज्यसभेत केला. केंद्रीय कायद्यान्वये स्थापन करण्यात आलेल्या विद्यापीठांमध्ये हस्तक्षेप करणे सरकारने थांबवावे, अशी सूचनाही त्यांनी या वेळी केली.दलित विद्यार्थी रोहित वेमुलाची आत्महत्या आणि जेएनयूमधील अटक याचा संदर्भ देऊन येचुरी म्हणाले की, विविध केंद्रीय विद्यापीठांमध्ये घडलेल्या घडामोडी तपासण्यासाठी सभागृहाची एक समिती स्थापन करावी.

हे विचारस्वातंत्र्य नव्हे – जेटली
जेएनयू विद्यार्थी नेत्यावर देशद्रोहाचा आरोप लावण्यावरून काँग्रेसने केलेल्या आरोपांना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत प्रत्युत्तर दिले. द्वेषमूलक भाषण करणे म्हणजे विचारस्वातंत्र्य होऊ शकत नाही, असे जेटली म्हणाले. विचारस्वातंत्र्य म्हणजे तुम्ही देशाचे तुकडे करू शकता असा होतो का, गुंडगिरीला विरोध आहे मात्र देशद्रोहाला नाही, अफझल गुरूसाठी तुम्ही कार्यक्रम आयोजित करणार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राचा वापर करणार, काँग्रेसचे दोन पंतप्रधान दहशतवादाचे बळी ठरले आहेत त्यामुळे दहशतवादाविरुद्ध बोलताना तुम्ही अधिक काळजी घेतली पाहिजे, असेही अर्थमंत्री म्हणाले.