समाजवादी पक्षासोबत काडीमोड घेऊन भाजपात प्रवेश करणाऱ्या नरेश अग्रवाल यांच्याबाबत निर्माण झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये असेच दिसते आहे. कारण जया बच्चन यांचा उल्लेख नरेश अग्रवाल यांनी डान्स करणाऱ्या असा केला. ज्याबाबत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सुषमा स्वराज यांच्या पाठोपाठ आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि भाजपा नेत्या रूपा गांगुली यांनीही ट्विटरच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे.

नरेश अग्रवाल यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मात्र जया बच्चन यांच्याबाबत त्यांनी केलेली टीका अयोग्य आणि चुकीची आहे असे ट्विट स्मृती इराणी यांनी केले आहे. तर भाजपा नेत्या रुपा गांगुली यांनीही ट्विट करून नरेश अग्रवाल यांच्यावर टीका केली आहे. नरेश अग्रवाल यांनी जया बच्चन यांच्याबाबत केलेले वक्तव्य हीन पातळीचे आहे. जया बच्चन यांच्या सिनेसृष्टीतील योगदानाबाबत मला पूर्ण आदर आहे. तसेच एक खासदार म्हणून त्यांनी केलेले कामही मी जवळून पाहिले आहे अशा आशयाचे ट्विट रूपा गांगुली यांनी केले आहे.

सोमवारी नरेश अग्रवाल यांनी भाजपामध्ये प्रवेश करताच जया बच्चन यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. ज्याचा निषेध सुषमा स्वराज यांनीही केला. त्याचप्रमाणे स्मृती इराणी आणि रूपा गांगुली यांनीही ट्विट करून नरेश अग्रवाल यांचे वक्तव्य चुकीचे आहे असे म्हटले आहे.