ललित मोदी मुद्यावर स्वत:चा भावनात्मक बचाव करणाऱ्या परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज या ‘नाटकबाजीतील तज्ज्ञ’ असल्याचा शेरा काँग्रेसने शुक्रवारी मारला. त्यावर, संसदेत बोलण्याऐवजी दूरचित्रवाहिन्यांना ‘बाईट’ देणे सोपे असल्याची तीव्र प्रतिक्रिया भाजपने दिली.
आपल्या २५ खासदारांच्या निलंबनाविरुद्ध निदर्शने सुरूच ठेवणाऱ्या काँग्रेसने आपला हल्ला आज आणखी तीव्र केला. आयपीएलचे माजी प्रमुख ललित मोदी यांना तुरुंगाबाहेर ठेवण्यासाठी तुमच्या कुटुंबाला किती पैसा मिळाला, असा एक पाऊल पुढे टाकणारा प्रश्न पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वराज यांना उद्देशून विचारला.
राहुल यांच्या या आरोपाला प्रत्युत्तर देताना भाजपने सांगितले, की ‘सामान्य कुटुंबांना’ उदरनिर्वाह करण्यासाठी काम करावे लागते, मात्र ‘वारसा लाभलेले’ गांधी घराणे याला अपवाद असू शकेल. सोनिया यांनी वापरलेल्या ‘नाटकबाजी’ शब्दामुळे संसदेची प्रतिष्ठा कमी झाली असल्याचे स्मृती इराणी म्हणाल्या. संसद हे ‘थिएटर’ झाले असल्याचे काँग्रेस अध्यक्षांना म्हणायचे आहे काय, असा प्रश्न त्यांनी विचारला.
ललित मोदी आणि सुषमा स्वराज यांच्याशी संबंधित संपूर्ण प्रकरण ‘चोरीचा मामला’ असल्यामुळे गुप्त ठेवण्यात आल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. त्यावर, असे वक्तव्य जनादेशाचा अनादर करणारे असून काँग्रेस पक्षाने, विशेषत: राहुल यांनी संसदेची प्रतिष्ठा कमी करणारी कृत्ये करू नयेत, असे उत्तर स्मृती इराणी यांनी दिले.
संसद ठप्प पाडण्याच्या सोनिया गांधी व काँग्रेसच्या निर्णयावर टीका करताना इराणी म्हणाल्या की, दीड मिनिटासाठी ‘बाईट’ देणे सोपे आहे, पण संसदेत कागदपत्रांचा उपयोग न करता दीड तास बोलणे मात्र कठीण आहे.