मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या गाडीला शनिवारी यमुना द्रुतग्रती मार्गावर झालेल्या अपघातासंदर्भात आता एक नवा खुलासा समोर आला आहे. या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीच्या मुलीने स्मृती इराणी आम्हाला जखमी अवस्थेतच घटनास्थळी टाकून गेल्याचा आरोप केला आहे. इराणी यांनी मदत केली असती तर माझे बाबा वाचले असते, असे तिने सांगितले.  मृत व्यक्ती ही आग्रास्थित डॉक्टर असून अपघातावेळी गाडीत त्यांच्याबरोबर त्यांची मुलगी आणि भाचा होता. स्मृती इराणी यांच्या गाड्यांचा ताफा आमच्या कारवर येऊन आदळला. त्यावेळी मी जखमी अवस्थेत गाडीच्या बाहेर येऊन इराणींकडे मदतीची याचना केली. मात्र, स्मृती इराणी यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केले आणि त्या तशाच अवस्थेत आम्हाला टाकून निघून गेल्या, असे या मुलीने सांगितले. याप्रकरणी स्मृती इराणी यांच्या गाडीच्या चालकाविरोधात आग्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचेही वृत्त आहे. माझी बहीण जखमी अवस्थेत स्मृती इराणी यांच्याकडे अक्षरश: मदतीची भीक मागत होती. मात्र, त्या तिला मदत न करताच निघून गेल्याचे या मुलीच्या भावाने सांगितले.


स्मृती इराणी शनिवारी वृंदावन येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यक्रमाहून दिल्लीला जाताना हा अपघात झाला. अपघातात तीन सुरक्षा रक्षक तसेच चालक जखमी झाले. यामध्ये स्मृती इराणींच्या गुडघ्याला जखम झाली होती.