स्पॉट फिक्सिंगमुळे भारतीय क्रिकेटवर पडलेला ‘डाग’ पुसण्याची वेळ आलेली आहे, असे मत भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्षा स्मृती इराणी यांनी व्यक्त केले. हे आपले व्यक्तिगत मत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीमुळे क्रिकेटची विश्वासार्हता संकटात सापडली असताना देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने याबाबत अजून कोणतीही अधिकृत भूमिका घेतलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर स्मृती इराणी यांनी व्यक्तिगत मत व्यक्त केले.
त्या म्हणाल्या, भारतात क्रिकेट हा केवळ खेळ नसून, तो एक धर्म आहे. कोणत्याही एका खेळाडूपेक्षा क्रिकेट हा खेळ कधीही मोठाच आहे. दोषींना कठोर शिक्षा देऊन क्रिकेटवर पडलेला ‘डाग’ पुसण्याची वेळ आता आलीये. क्रिकेटला सन्मानाचे स्थानही परत मिळवून दिले पाहिजे.
स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीविरोधात कडक कायदे तयार केले पाहिजेत. तशी मागणी आम्ही केंद्र सरकारकडे अगोदरच केलेली आहे, असेही त्यांनी सांगितले.