अमेठी आणि रायबरेली या दोन्ही मतदारसंघाचा विकास करण्याची केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांची इच्छा आहे, तर रायबरेलीमध्ये आयआयआयटी सुरू करण्यापासून त्यांना कोणी रोखले आहे, असा प्रश्न बुधवारी प्रियांका गांधी यांनी विचारला. अमेठी आणि रायबरेलीतील जनतेने आतापर्यंत केवळ आश्वासनेच ऐकली आहेत. मात्र, या दोन्ही ठिकाणांचा विकास आता खऱया अर्थाने सुरू होणार असल्याचे स्मृती इराणी यांनी म्हटले होते. त्याला प्रियांका गांधी यांनी उत्तर दिले.
रायबरेली हा कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा मतदारसंघ असून, अमेठी हा राहुल गांधी यांचा मतदारसंघ आहे. प्रियांका गांधी दोन दिवस रायबरेलीच्या दौऱयावर आहेत. स्मृती इराणी यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावत त्यांनी मागच्या यूपीए सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे रायबरेलीमध्ये आयआयआयटी सुरू करण्यापासून स्मृती इराणी यांना कोणी रोखले आहे, याचे उत्तर द्यावे, असा प्रश्न त्यांनी विचारला. युवकांसमोर सध्या अनेक प्रश्न आहेत आणि त्यावर मार्ग शोधणे हे मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे काम आहे. मग त्या यात का लक्ष घालत नाहीत, असाही प्रश्न प्रियांका गांधी यांनी विचारला.
सध्या रायबरेलीतील नागरिकांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आपण सातत्याने या मतदारसंघात येतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.