केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सोमवारी गुजरातच्या पूरग्रस्तांची भेट घेतली, पूरग्रस्तांना भेटण्यासाठी त्यांनी होडीत बसून गुजरातच्या पूरग्रस्त भागांचा दौरा केला तसंच मदत आणि बचाव कार्य कशा प्रकारे सुरू आहे याचाही आढावा घेतला. गुजरातमधल्या बनासकांठा भागाला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. स्मृती इराणी यांनी या भागाला भेट देऊन तिथली परिस्थिती जाणून घेतली.

बनासकांठा भागात पुराच्या तडाख्यामुळे ६० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे, तर शेकडो लोक बेघर झाले आहेत. पूरग्रस्त भागातल्या लोकांसाठी ९० मदत छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये ६० हजार पेक्षा जास्त पूरग्रस्त लोक राहात आहेत. तसंच २० लाखांपेक्षा जास्त अन्नाची पाकिटं वाटण्यात आली आहेत अशी माहितीही स्मृती इराणी यांनी दिली.

गुजरातमधल्या बनास नदीला पावसामुळे पूर आला आहे ज्यानंतर खारा या गावातल्या लोकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला. गेल्या सात दिवसांपासून या गावातलं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. आपल्या एक दिवसाच्या गुजरात दौऱ्यात स्मृती इराणी यांनी या गावाचीही पाहाणी केली.

खारा गावाला राज्याच्या इतर भागांशी जोडणारा मार्गही पाण्याखाली गेला आहे. एनडीआरएफच्या पथकासह स्मृती इराणी या ठिकाणी आल्या आणि त्यांनी किती नुकसान झालं आहे त्याची पाहाणी केली. खारा गावांतून आत्तापर्यंत १० लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या पथकाला यश आलं आहे. सध्याच्या घडीला पाऊस थांबला आहे त्यामुळे मदत आणि बचाव कार्यात अडचणी येत नाहीयेत. एनडीआरएफचं पथक आणि बचाव पथकानं पूर परिस्थितीत चांगलं काम केल्याचंही स्मृती इराणी यांनी स्पष्ट केलं आहे.