चांगली पर्सनॅलिटी नसल्याचे कारण देत जेट एअरवेजने करिअरच्या सुरुवातीला मला नोकरी नाकारली होती, असे सांगत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी आपली आतापर्यंतची वाटचाल इतरांप्रमाणेच खडतरपणे झाल्याचे सांगितले. हवाई वाहतूक प्रवासी महासंघाने नवी दिल्लीमध्ये एका पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला स्मृती इराणी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी आपले मनोगत मांडताना आठवणींना उजाळा दिला.
त्या म्हणाल्या, खरंतर हे किती लोकांना माहिती आहे, हे मला माहिती नाही. पण मला पहिली नोकरी विमान वाहतूक कंपनीमध्ये हवी होती. ‘केबिन क्रू’साठी मी जेट एअरवेजमध्ये मुलाखती द्यायला गेले होते. पण तिथे मला नाकारण्यात आले. पर्सनॅलिटी चांगली नसल्याचे कारण देत मला ती संधी नाकारण्यात आली. पण आता मला खरंतर त्यांनी नकार दिल्याबद्दल त्यांचे आभारच मानावेसे वाटताहेत. त्या नकारानंतर मला मॅक्डोनाल्डमध्ये नोकरी मिळाली. तिथून पुढे काय घडले हा इतिहास तर सगळ्यांनाच माहिती आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये स्मृती इराणी यांनी जेट एअरवेजच्या अधिकाऱ्याला एक पुरस्कार प्रदान केला. त्यानंतर त्यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला. विमान वाहतूक क्षेत्रातील एक प्रवासी म्हणूनच मी या सोहळ्याला उपस्थित असल्याचेही त्यांनी सांगितले.
अभिनय क्षेत्राला रामराम ठोकत स्मृती इराणी २००३ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. २००४ आणि २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूकही लढविली होती. पण पहिल्यांदा कपिल सिब्बल यांच्याकडून आणि नंतर राहुल गांधी यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर स्मृती इराणी यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. त्यांच्याकडे मनुष्यबळ विकास या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी देण्यात आली होती. पण नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलामध्ये त्यांच्याकडील हे खाते काढून घेण्यात आले आणि त्यांच्याकडे वस्त्रोद्योग विभागाची जबाबदारी देण्यात आली.