भारतातून तस्करी झालेल्या ब्रॉन्झच्या पाच मूर्त्यां अमेरिकी कस्टम अधिकाऱ्यांनी पकडल्या. यामध्ये कोटय़वधी डॉलर किंमत असलेली तामीळनाडूच्या मंदिरातून पळविण्यात आलेली पार्वतीची दुर्मीळ मूर्तीही समाविष्ट आहे. भारतीय मूर्ती तस्करांकडून या मूर्तीची विक्री करण्यात आली होती. पार्वतीची मूर्ती भारताचा सांस्कृतिक ठेवा असून, तामीळनाडूमधील मंदिरातून पळविण्यात आलेल्या दुर्मीळ गोष्टींपैकी एक आहे. अमेरिकेच्या कस्टम विभागाच्या विशेष पथकाद्वारे नेवार्क येथे ही कारवाई करण्यात आली. हे पथक भारतीय अधिकारी, इंटरपोल यांच्यासोबत आंतरराष्ट्रीय तस्करीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्यरत असते. या मूर्तीची किंमत ५० लाख डॉलर इतकी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारतीय दुर्मीळ वस्तूंचा तस्कर सुभाष कपूर याने या मूर्ती विकल्याचा कयास आहे. कपूर याच्यावर सध्या भारतामध्ये खटला सुरू आहे. त्याच्यावर इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस बजावली होती. त्याला गेल्या वर्षी फ्रँकफर्ट येथून अटक करण्यात आली. या वर्षी जुलै महिन्यात जर्मन सरकारने त्याला भारताकडे सुपूर्द केले.