देशातील तरूणांच्या मनात विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयी आवड उत्त्पन्न व्हावी, यासाठी भारतीय संशोधकांनी प्रादेशिक भाषेचा वापर करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते सोमवारी प्राध्यापक सत्येंद्रनाथ बोस यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त कोलकाता येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मोदींनी म्हटले की, प्रादेशिक भाषांमध्ये विज्ञान शिकवण्याच्या कार्यात प्राध्यापक बोस यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी विज्ञानाच्या प्रसारासाठी ‘ग्यान ओ बिग्यान’ हे बंगाली मासिक सुरू केले होते. जेणेकरून विद्यार्थ्यांना विज्ञानाबद्दलच्या गोष्टी समजावून घेता येतील आणि त्यांच्यामध्ये या विषयाची आवड उत्त्पन्न होईल. त्यामुळे सध्याच्या घडीला आपल्याकडे विज्ञानाविषयी मोठ्याप्रमाणावर चर्चा घडवून आणणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे भाषा हा अडथळा न ठरता माहितीचे माध्यम व्हायला पाहिजे, असे मोदींनी सांगितले.

तसेच देशातील शास्त्रज्ञांनी सामाजिक व आर्थिक समस्या सोडवणाऱ्या गोष्टींचा शोध लागण्यावर लक्ष दिले पाहिजे. जेणेकरून या सगळ्याचा लोकांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम होईल. वैज्ञानिक यश आणि शोध हे केवळ प्रयोगशाळांपुरतेच मर्यादित राहिले तर तो सामान्य लोकांवर अन्याय ठरेल. त्यामुळे वैज्ञानिक शोध जेव्हा सामान्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणतील तेव्हाच शास्त्रज्ञांच्या मेहनतीचे खऱ्या अर्थाने चीज होईल. त्यामुळेच एखादा शोध आणि संशोधनाचे अंतिम फलित हे लोकांपर्यंत पोहोचण्याची आणि सामाजिक व आर्थिक समस्या सोडवणारे असावे, ही काळाची गरज आहे. तुमच्या शोधांमुळे गरिबांचे आयुष्य सुकर होते का, मध्यमवयीन लोकांच्या समस्या सुटतात का, या गोष्टींकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे. याच गोष्टींचा विचार करून भविष्यात संशोधनाची दिशा निश्चित करा, असे मोदींनी शास्त्रज्ञांना सांगितले.

याशिवाय, देशातील सर्व वैज्ञानिक संस्थांमधील शास्त्रज्ञांनी एकमेकांशी भागीदारी करून आपल्यातील सर्वोच्च क्षमतेपर्यंत पोहोचावे. आपण अनेक कारणांमुळे एका मर्यादेपलीकडे जात नाही. आपण क्वचितच आपल्या क्षेत्रातील अन्य संशोधकांशी आणि संस्थांसोबत आपल्या शोधाबद्दलच्या माहितीची देवाणघेवाण करतो. त्यामुळे आता आपण एखाद्या क्वांटमप्रमाणे आपल्या कक्षा सोडून बाहेर पडले पाहिजे, असे मोदींनी सांगितले.