गुजरातमधील महिसागर जिल्ह्यामध्ये एका ६० वर्षीय व्यक्तीचा साप चावल्याने मृत्यू झाला. मात्र या व्यक्तीनेही सापाला चावा घेतल्याने सापही मरण पावल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे. पर्वत गाला बारीया असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

महिसागरमधील सतरामपूर तालुक्यातील अजनवा गावामध्ये ही विचित्र घटना घडली. वडोदरापासून १२० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या गावाच्या सरपंचाने या घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

‘पर्वत हे शेतामध्ये वाळलेलं गवत ट्रकमध्ये भरण्याचं काम करत होते. त्यावेळी त्या गवातामधून साप बाहेर आला. सापाला पाहताच तेथील अनेकजण इकडे तिकडे पळू लागले. मात्र पर्वत यांनी पळून जाण्याऐवजी मी याआधीही साप पकडले आहेत असं सांगत तेथेच उभं राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी सापाला पकडले,’ अशी माहिती गावाच्या सरपंचाने दिली. पर्वत यांनी साप पकडल्यानंतर सापाने त्यांच्या हाताला आणि चेहऱ्याला चावा घेतला. अचानक सापाने केलेल्या या हल्ल्यामुळे संतापलेल्या पर्वत यांनी खाली पडण्याआधी सापाला कडकडून चावा घेत तो खाली टाकला. पर्वत यांनी चावा घेतलेला साप मरण पावल्याचे गावाच्या सरपंचाने सांगितले.

सर्पदंश झालेल्या पर्वत यांना लुनवाडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे पुरेसे उपचार साहित्य उपलब्ध नसल्याने त्यांना गोध्रा येथील मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र विष शरीरात पसरल्याने पर्वत यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अजनवा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.