18 January 2018

News Flash

काश्मीरमध्ये थंडीच्या लाटेत दोघांचा मृत्यू

जम्मू आणि काश्मीरमधील बहुतांश ठिकाणी गुरुवारी संध्याकाळपासून मोसमातील पहिली हिमवृष्टी झाल्याने तेथे कडाक्याच्या थंडीची लाट आली आहे. या थंडीने एका साधूचा व एका भिकाऱ्याचा बळी

पीटीआय, नवी दिल्ली | Updated: December 15, 2012 12:32 PM

जम्मू आणि काश्मीरमधील बहुतांश ठिकाणी गुरुवारी संध्याकाळपासून मोसमातील पहिली हिमवृष्टी झाल्याने तेथे कडाक्याच्या थंडीची लाट आली आहे. या थंडीने एका साधूचा व एका भिकाऱ्याचा बळी घेतला असून, हिमवर्षांवामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. परिणामी, काश्मीरचा देशाशी संपर्क तुटला आहे.
काश्मीर खोऱ्यात बहुतांश ठिकाणी गुरुवारी संध्याकाळपासून जोरदार हिमवृष्टी सुरू झाली. शुक्रवारी सकाळीही बर्फ कोसळत राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले. या हिमवृष्टीमुळे जम्मू-श्रीनगर हा २९४ किमीचा महामार्ग पूर्णपणे बंद पडला. काश्मीर खोऱ्यातील तापमानाचा पारा खाली घसरला असून किमान तापमान १३ पूर्णाक दोन दशांश सेल्सिअसइतके नोंदवले गेले. थंडीच्या या लाटेत एका साधूचा आणि एका भिकाऱ्याचा बळी गेला, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली. उत्तराखंडातही मसुरी, कुमाऊ, गढवाल आदी ठिकाणी जोरदार हिमवृष्टी झाली. उत्तराखंडात जोशीमठ येथे १२, तर डेहराडून येथे १० अंश सेल्सिअस नोंदवले गेले. काश्मीर आणि उत्तराखंडातील या हिमवृष्टीमुळे पंजाब, हरियाणा आणि चंदीगढ येथे जोरदार पाऊस झाला, या ठिकाणी पारा १० ते १२ अंशांपर्यंत खाली घसरला.     

वैष्णोदेवी परिसरातही हिमवृष्टी
लक्षणीय उंचीवर असणाऱ्या माता वैष्णोदेवी मंदिर परिसरातही या मौसमातील पहिली हिमवृष्टी झाली. हिमवृष्टीमुळे या परिसरात कमालीचा गारठा निर्माण झाला असूनही शुक्रवारी सुमारे १५ हजार भाविकांनी देवीचे दर्शन घेतले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

First Published on December 15, 2012 12:32 pm

Web Title: snow in the hills two dead due to cold
टॅग Kashmir,Snow
  1. No Comments.