श्रीनगर : काश्मीरच्या पर्वतीय भागात सोमवारी नव्याने हिमवृष्टी झाली, तर पठारी भागाला पावसाने तडाखा दिला. दरम्यान, काश्मीर खोऱ्याच्या रहिवाशांना थंडीच्या लाटेपासून थोडासा दिलासा मिळाला आहे.

काश्मीरच्या पठारी भागात तुरळक स्वरूपाचा पाऊस पडला, तर खोऱ्याच्या पर्वतीय भागात हिमवृष्टी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मंगळवापर्यंत राज्यात निरनिराळ्या ठिकाणी व्यापक पर्जन्य आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

श्रीनगरमध्ये रविवारी रात्रीचे किमान तापमान उणे ०.३ अंश सेल्सिअस, म्हणजे आदल्या रात्रीइतकेच होते. दक्षिण काश्मीरमधील काझीगुंड आणि उत्तर काश्मीरातील कुपवाडा येथे उणे ०.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कोकेरनाग येथे रात्रीचे तापमान उणे ०.३, तर पहलगाम येथे उणे ०.२ अंश सेल्सिअस होते.

लडाख भागातील लेह येथे उणे ५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली, तर कारगिल येथे तापमापकातील पारा उणे १४ अंश सेल्सिअसवर होता. अशा प्रकारे उणे ६.८ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवण्यात आलेल्या द्रासपेक्षाही कमी तापमान असणारे कारगिल हे जम्मू-काश्मीरमधील सर्वात थंड ठिकाण ठरले.