देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट निर्माण झालेले आहे. दररोज लाखांच्या संख्येत करोनाबाधित वाढत असल्याने, आरोग्य यंत्रणा कोलमडत आहे. अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड आदींसह लस, इंजेक्शन व औषध तुवटवडा निर्माण झालेला आहे. या पार्श्वभूमीवर मिळेल त्या ठिकाणाहून मेडिकल ऑक्सिजन घेऊन तो राज्यांपर्यंत पोहचवण्याचं काम सध्या केंद्र सरकारकडून सुरू आहे. यासाठी प्रमुख मदत ही भारतीय रेल्वेची होत आहे. आतापर्यंत भारतीय रेल्वेने २९६० मेट्रीक टन पेक्षा जास्त ऑक्सिजन विविध राज्यांपर्यंत पोहचवला आहे. याबाबतची सविस्तर माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आलेली आहे.

भारतीय रेल्वेने आतापर्यंत २९६० मेट्रीक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एलएमओ) देशभरातील विविध राज्यांना १८५ टँकरमध्ये वितरीत केला आहे. ४७ ऑक्सिजन एक्स्प्रेसने आतापर्यंत त्यांचा प्रवास पूर्ण केलेला आहे. अशी माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

तर, ही माहिती प्राप्त प्रसिद्ध होईपर्यंत, महाराष्ट्रात १७४ एमटी, उत्तर प्रदेशात ७२९ एमटी, मध्यप्रदेशमध्ये २४९ एमटी, हरयाणामध्ये ३०५ एमटी, तेलंगणात १२३ एमटी आणि दिल्लीत १३३४ एमटी ऑक्सिजन उतरवले गेले आहे. असे देखील सांगण्यात आले आहे.

सध्या १८ टँकर २६० एमटी ऑक्सिजनसह महाराष्ट्र, हरयाणा आणि दिल्लीच्या वाटेवर आहेत. अधिक भार असलेल्या ऑक्सिजन एक्स्प्रेस रात्रीनंतर प्रवासाला सुरूवात करणे अपेक्षित आहे. अशी माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

“आम्हाला कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका,” सुप्रीम कोर्ट मोदी सरकारवर संतापलं

दरम्यान, केंद्र सरकारला पुढील आदेशापर्यंत दिल्लीला रोज ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. दिल्लीमध्ये सध्या परिस्थिती गंभीर असून अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा मुबलक साठा उपलब्ध नसल्याने करोना रुग्णांचे हाल होत आहेत. केंद्राकडून दिल्ली सरकारला नुकतंच ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला होता. दिल्ली सरकारने आम्हाला रोज इतकाच ऑक्सिजन पुरवठा केला जावा अशी मागणी केली असताना केंद्राने मात्र असमर्थता दर्शवली आहे. यावरुन सुप्रीम कोर्टाने केंद्राला गुरुवारी फटकारलं असताना पुन्हा एकदा खडे बोल सुनावले आहेत.