करोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाउन आता हळूहळू शिथिल केला जात आहे. केंद्र सरकारनं ८ जूनपासून धार्मिक स्थळांसह हॉटेल, रेस्टॉरंट खुली करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, त्यासाठी काही नियमांचं बंधन घालण्यात आलं आहे. रेस्टॉरंट खुलं होऊन एक उलटत नाही, तोच पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. रेस्टॉरंटमध्ये वाढदिवसाची पार्टी आयोजित केल्यावरून पोलिसांनी दिल्लीत ही कारवाई केली आहे.
तब्बल अडीच महिन्यानंतर देशातील लॉकडाउन शिथिल करण्यात आला असून, देशातील अनेक राज्यांमध्ये धार्मिक स्थळांसह मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंट खुली झाली आहेत. यासंदर्भात केंद्र सरकारनं नियमावली जारी केली असून, त्याचं पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, पश्चिम दिल्लीतील राजौरी गार्डन परिसरात असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये वाढदिवसाची पार्टी आयोजित करण्यात आली होती.
“सोमवारी गस्तीवर असलेल्या पोलिसांना रात्री ९ वाजता नजफगढ रोडवर असलेल्या कुबितोस रेस्टॉरंटमध्ये हालचाली दिसून आल्या. त्यामुळे पोलिसांनी रेस्टॉरंटला अचानक भेट दिली. त्यावेळी वाढदिवसाची पार्टी सुरू असल्याचं पोलिसांना कळालं. या पार्टीला तब्बल ३८ जण उपस्थित होते. त्याचबरोबर पार्टीच्या ठिकाणी हुक्काही सापडला,” असं पोलिसांनी सांगितलं.
केंद्र सरकारनं रेस्टॉरंट सुरू करताना काही नियमाचं पालन करण्याचे निर्देश जारी केलेले असताना पार्टीमध्ये नियमाचं पालन केलं गेलं नसल्याचं पोलिसांना दिसून आलं. रेस्टॉरंट क्षमतेच्या ५० टक्केच ग्राहकांना प्रवेश देण्यासह सोशल डिस्टसिंगचं पालन करण्याचे निर्देश सरकारनं दिलेले आहेत. अशात रेस्टॉरंटची क्षमता ४८ लोकांची असताना ३८ लोकांना प्रवेश देण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी रेस्टॉरंटचा मालक अक्षय चडा, मॅनेजर मनोज कुमार, पार्टी आयोजित करणारा मनान माजिद आणि वाढदिवस असलेल्या मोहम्मद आसिफ यांना अटक केली आहे. आरोपींना अटकेनंतर जामीनावर सुटका करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक पुरोहित यांनी दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 9, 2020 8:22 pm