भारतासह जगभरातील कोट्यवधी लोक दिवसातील अनेक तास सोशल मीडियावर घालवतात. मात्र यामुळे समाजाला धोका पोहोचत असून त्यामध्ये फूट पडत असल्याचे मत फेसबुकच्या युजर ग्रोथ विभागाचे माजी उपाध्यक्ष चमथ पलिहापिटिया यांनी व्यक्त केले आहे. स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमध्ये त्यांनी एका व्याख्यानादरम्यान श्रोत्यांशी संवाद साधला.

‘फेसबुकमुळे अनेकदा चुकीची माहिती शेअर होते. त्यामुळे अनेकदा गैरसमज पसरतात. चुकीच्या माहितीमुळे अनेकदा समाजात फूट पडते. एखाद्या विषयावरुन किंवा मुद्द्यावरुन समाजात समर्थक आणि विरोधक असे दोन गट पडतात. त्यामुळे संपूर्ण समाजच दुभंगला जातो. चिंताजनक बाब म्हणजे ही काही अमेरिका आणि रशियातील समस्या नाही. ही समस्या संपूर्ण जगभरात निर्माण झाली आहे,’ असे पलिहापिटिया यांनी म्हटले.

कालच फेसबुकचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या सेन पार्केर यांनी फेसबुकच्या धोरणांवर टीका केली होती. फेसबुकच्या धोरणांमुळे वापरकर्त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याचे त्यांनी म्हटले होते. पार्केर यांच्या या विधानानंतर दुसऱ्याच दिवशी फेसबुकचे माजी वरिष्ठ अधिकारी राहिलेल्या पलिहापिटिया यांनी फेसबुकच्या धोरणांवर तोंडसुख घेतले. यावेळी त्यांनी भारतातील एका घटनेचा उल्लेख करत सोशल मीडियाचे दुष्परिणाम अधोरेखित केले. ‘काही दिवसांपूर्वीच भारतात व्हॉट्सअॅपवर एक बोगस मेसेज फिरत होता. त्यामध्ये अपहरण झाल्याची चुकीची माहिती होती. यामुळे सात निष्पाप लोकांचा नाहक जीव गेला,’ असे त्यांनी सांगितले.