कर्नाटक सरकारवर टीका करताना भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याकडून मोठी चूक झाली आहे. अमित शहांची ही चूक सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. अमित शहांकडून बोलता बोलता झालेली चूक फेसबुक आणि ट्विटवर मोठ्या प्रमाणात शेअर केली जाते आहे. काँग्रेसच्या मीडिया सेलच्या अध्यक्षा रम्या यांनीदेखील अमित शहांकडून झालेली चूक शेअर करत त्यांची खिल्ली उडवली आहे. कर्नाटकमधील काँग्रेस सरकारवर हल्लाबोल करताना अमित शहांकडून मोठी चूक झाली.

भाजपचे अध्यक्ष अमित शहा १४ ऑगस्टला कर्नाटकची राजधानी बंगळुरुत होते. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील सत्ताधारी काँग्रेसवर निशाणा साधला. मात्र काँग्रेसच्या चुका मोजून दाखवता दाखवता स्वत: अमित शहांनीच मोठी चूक केली. ‘केंद्रातील भाजप सरकार कर्नाटकच्या विकासासाठी निधी देत नाही, असे येड्डियुरप्पा म्हणतात,’ असे शहा पत्रकार परिषदेत बोलून गेले. खरंतर शहांना राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे नाव घ्यायचे होते. मात्र त्यांनी चुकून भाजपच्याच येड्डियुरप्पा यांचे नाव घेतल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.

अमित शहांची चूक पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांनी लक्षात आणून दिली. यानंतर अमित शहांनी उपस्थितांची माफी मागितली. ‘मला माफ करा. मी सिद्धरामय्या यांच्याऐवजी येड्डियुरप्पा यांचे नाव घेतले. मित्रांनो चूक झाली,’ अशा शब्दांमध्ये शहा यांनी स्वत:ची बाजू सावरुन घेतली. कर्नाटक सरकारवर तोफ डागताना केंद्राने दिलेला निधी जातो कुठे, असा सवाल शहांनी उपस्थित केला. ‘कर्नाटकात विकासकामे होत नाहीत. शेतकऱ्यांनादेखील फायदा मिळत नाही. मग सर्व पैसा जातो कुठे ? कर्नाटकमधील जनतेला काँग्रेसकडून या प्रश्नाचे उत्तर हवे आहे,’ असे ते म्हणाले. यापुढे बोलताना ‘येड्डियुरप्पा केंद्राकडून निधी मिळत नाही, असे वारंवार बोलतात,’ असे शहा म्हणाले. शहांची ही चूक केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्या लक्षात आणून दिली. येड्डियुरप्पा कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत.