खूप समस्या आहेत, काहीच व्यवस्थित होत नाहीये असं प्रत्येकाला वाटत असतं. आयुष्यात समस्या नाहीत अशी व्यक्ती मिळणं कठीणच. पण समस्येवर मात करत पुढे जाणं आपल्या हातात असतं. अनेकदा अशा व्यक्ती आपल्याला भेटत असतात ज्यांना पाहून आपल्या समस्या खूपच छोट्या असल्याचं जाणीव होते. अशाच एका आजीबाईंचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे जो व्हिडीओ पाहून तुम्हाला प्रेरणा मिळेल.

सध्या सोशल मीडियावर एका टाइपरायटर आजीबाईंचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हतिंदर सिंह यांनी ट्विटरला हा व्हिडीओ शेअर केल्यापासून तो चर्चेत आला आहे. हतिंदर सिंह यांनी ही महिला मध्य प्रदेशातील असून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बसल्या आहेत अशी माहिती दिली आहे. व्हिडीओत आजीबाईंचा टायपिंग करताना स्पीड आणि उत्साह तितकाच असल्याचं दिसतंय. ज्या वयात आराम केला पाहिजे त्या वयात आजीबाई कष्ट करुन पैसे कमावत आहेत. बरं त्यांना एकदम स्पष्ट दिसत असून, ऐकायलाही व्यवस्थित येतंय.

हतिंदर सिंह यांनी ट्विटरला शेअर करताना लिहिलं आहे की, ‘हा व्हिडीओ मध्य प्रदेशातील आहे जिथे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर वयस्कर महिला हिंदी टायपिस्ट म्हणून काम करते. ज्या वयात लोक काम करणं बद करतात त्या वयातही त्यांचा स्पीड आणि उत्साह पहा. त्यांचा आदर म्हणून त्यांना प्रसिद्ध करु’.