राम मंदिराच्या उभारणीला लवकरच सुरुवात होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन केलं जाणार आहे. यासाठी ५ ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मंदिराच्या भूमिपूजनाला विशेष माती आणली जाणार आहे. ही माती संगमावरून आणली जाणार असून, माती आणणाऱ्या व्यक्तीचं नाव लवकरच जाहीर केलं जाणार आहे.

अयोध्येत राम मंदिर उभारण्याच्या कामाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरूवात होणार आहे. ५ ऑगस्ट रोजी पायाभरणीचा कार्यक्रम होणार असून, यासाठी विशेष तयारी सुरू आहे. भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी संगम अर्थात गंगा, यमुना आणि सरस्वतीचा संगम असलेल्या ठिकाणाची माती अयोध्येत आणण्यात येणार आहे. विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवक्ते अश्विनी मिश्रा यांनी याविषयीची माहिती दिली. “राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी संगमावरील माती आणि पवित्र जल वापरायला हवं, असं विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष स्व. अशोक सिंघल यांनी म्हटलं होतं. ही माती आणणाऱ्यांची नावं निश्चित करण्यात येणार असून, लवकरच त्याची घोषणा करण्यात येईल,” अशी माहिती मिश्रा यांनी दिली.

पाहा फोटो >> मोदी, अडवाणी यांच्यासहित ५० व्हीआयपी, भल्या मोठ्या स्क्रीन्स; अयोध्या मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम

आणखी वाचा- “राम मंदिर भूमिपूजनापूर्वी बाबरी कटाचा खटलाच बरखास्त केला तर शहीद झालेल्यांना मानवंदना ठरेल”

गर्भगृहापासून मंदिराच्या कळसाची उंची पूर्वी १२८ फूट इतकी होती, ती वाढवण्यात आली आहे. आता कळसाची उंची १६१ फूट इतकी असणार आहे. यात मंदिराच्या भिंती ६ फुटांच्या दगडांनी बांधण्यात येणार आहे. तर दरवाजा संगमरवरी दगडानं बनवण्यात येणार आहे. मंदिराच्या पूर्वीच्या रचनेत तीन कळस होते. मात्र सुधारित प्रस्तावात आता ५ कळस असणार आहेत. तर मंदिराला पाच प्रवेशद्वार असणार आहेत.