surya grahan june 2020 : पाच जून रोजी झालेल्या चंद्रग्रहणानंतर याच महिन्यात २१ तारखेला सूर्यग्रहण होणार आहे. हे दुर्मिळ असं कंकणाकृती सूर्यग्रहण असेल. या वर्षी दोन चार चंद्रग्रहण आणि दोन सूर्यग्रहण होणार आहेत. त्यापैकी १० जानेवारी आणि पाच जून रोजी दोन चंद्रग्रहण झाली आहेत. आता २१ तारखेला पहिलं सूर्यग्रहण आणि वर्षातील तिसरे ग्रहण होणार आहे. भारतामध्ये काही भागांतून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे, तर काही भागांतून खंडग्रास दिसणार आहे. संपूर्ण आयुष्यात क्वचितच कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची संधी मिळते

भारतामध्ये प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये हे सूर्यग्रहण कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे तर महाराष्ट्रामध्ये हे खंडग्रास सुर्यग्रहणाच्या स्वरूपात पाहता येणार आहे. उत्तराखंडच्या जोशी मठ, डेहराडून तसेच हरियाणाच्या कुरुक्षेत्र, पोहोवा, इटिया या भागातून सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती दिसणार आहे. देशाच्या इतर भागांतून खंडग्रास स्थिती दिसणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून हे ग्रहण खंडग्रास दिसेल. महाराष्ट्रात सकाळी १० ते १.२८ या काळात हे ग्रहण दिसणार आहे.

२१ तारखेला दिसणाऱ्या सूर्यग्रहणाची वेळ काय?
सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी ग्रहणाला सुरूवात होणार आहे. दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी सर्वोच्च स्थितीमध्ये असेल तर दुपारी तीन वाजता हे संपणार आहे. म्हणजेच हे सूर्यग्रहण जवळपास सहा तास चालणार आहे.

सूर्यग्रहण म्हणजे काय?
सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये जेव्हा चंद्र येतो तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. या सावलीतून दिसणाऱ्या स्थितीला सूर्यग्रहण असे म्हणतात.

खग्रास सूर्यग्रहण –
जेव्हा सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे लपला जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात.

खंडग्रास सूर्यग्रहण –
जेव्हा सूर्याचा काही भागच चंद्राच्या मागे जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात.

कंकणाकृती सूर्यग्रहण –
कंकणाकृती सूर्यग्रहणामध्ये चंद्र पृथ्वीपासून त्याच्या सर्वाधिक लांब अंतरावर राहून सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येऊन सूर्याच्या प्रकाशाला झाकून टाकतो . या सूर्यग्रहणात चंद्र जास्त अंतरावर असल्यामुळे तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. अशावेळी सूर्याची वर्तुळाकार कडा चंद्राच्या मागे निर्माण होते.

तुमच्या डोळ्यांचे संरक्षण करा –

सूर्यग्रहण असो वा नसो, सूर्याकडे थेट उघडय़ा डोळ्यांनी पाहणे हानिकारक आहे. सूर्यग्रहण पाहू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला सुरक्षित सोलर फिल्टर्स असलेले चष्मे घालण्याचा किंवा प्रोजेक्शन पद्धत वापरून सूर्यग्रहण पाहण्याचा आग्रह धरा. सुरक्षित सौर चष्मे किंवा तज्ज्ञांनी सुचवलेल्या सुरक्षित पद्धतीनेच कुणीही, कोणत्याही ठिकाणावरून सूर्यग्रहणाचा आनंद लुटू शकतो, यात शंका नाही.