सौरघटाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी वैज्ञानिकांनी एक नवीन पद्धत शोधून काढली आहे. त्यासाठी त्यांनी जास्तीतजास्त सौरऊर्जा सौरघटांकडून घेतली जाईल असे पदार्थ तयार केले आहेत.  
राइस विद्यापीठाने सिलिकॉनमध्ये एचिंग पद्धतीने नॅनो आकाराच्या चिरा पाडून ९९ टक्के सूर्यप्रकाश या सिलिकॉन चिप्स ग्रहण करतील अशी व्यवस्था केली आहे. सौरघटातील कृतिशील घटकांना हा सूर्यप्रकाश मिळतो व ते घटक सूर्यप्रकाशाचे ऊर्जेत रूपांतर करतात. रसायनशास्त्रज्ञ अँड्रय़ू बॅरॉन व राइस विद्यापीठाचा विद्यार्थी येन तिएन लू यांनी याबाबत शोधनिबंध लिहिला असून तो रॉयस सोसायटी ऑफ केमिस्ट्रीच्या जर्नल ऑफ मटेरियल्स केमिस्ट्री या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. सौरघट जेवढा जास्त सूर्यप्रकाश सक्रिय पदार्थामार्फत शोषतात तेव्हा ते जास्त वीज तयार करू शकतात.
सध्या या सक्रिय घटक पदार्थाना ज्याचा थर दिला जातो त्यामुळे बराचसा प्रकाश त्यांच्यापर्यंत पोहोचतो, परंतु काही प्रकाश परावर्तित होतो. वेगवेगळय़ा मार्गाने प्रयत्न करून सूर्यप्रकाशाचे परावर्तन ६ टक्क्यांनी कमी होते असे बॅरॉन यांनी सांगितले, परंतु विशिष्ट तरंगलांबीच्या प्रकाशाबाबतीतच हे शक्य आहे. काळे सिलिकॉन काहीच प्रकाश परावर्तित करीत नाही. काळे सिलिकॉन हे असे सिलिकॉन असते ज्याचा पृष्ठभाग हा नॅनो आकारात कोरलेला असतो व तो कोरीव भाग हा प्रकाशाच्या तरंगलांबीपेक्षा लहान असतो, त्यामुळे सूर्योदय ते सूर्यास्त या काळात कोणत्याही कोनातून आलेला सूर्यप्रकाश त्यात शोषला जातो.
नेमका हा फरक कशामुळे पडतो..
कॉपर नायट्रेट, फॉस्फरस अ‍ॅसिड, हायड्रोजन फ्लोराईड, पाणी यांचा वापर त्यात केला जातो याचे मिश्रण हे सिलिकॉन पापुद्रय़ावर लावले जाते. फॉस्फरस अ‍ॅसिड तांब्याचे आयन कमी करते व त्याचे नॅनोकणात रूपांतर करते. नॅनोकण सिलिकॉन पापुद्रय़ावरील इलेक्ट्रॉनना आकर्षित करते व त्याचे ऑक्सिडीकरण करते, त्यामुळे हायड्रोजन फ्लोराईडचे ज्वलन होते त्यामुळे सिलिकॉनमध्ये पिरॅमिडच्या आकाराचा कोरीव भाग तयार होतो. काळय़ा सिलिकॉन थरात हा कोरीव भाग ५९० नॅनोमीटर असतो, त्यामुळे ९९ टक्के प्रकाश शोषला जातो. ज्यात कोरीव काम नसते त्या सिलिकॉन थरात सूर्यप्रकाश परावर्तित केला जातो.