सौर ऊर्जा घोटाळ्यावरून केरळ सरकारमध्ये नेतृत्वबदल करण्यात येण्याची शक्यता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि संरक्षणमंत्री ए. के. अ‍ॅण्टनी यांनी मंगळवारी फेटाळून लावली.माकपच्या नेतृत्वाखालील डावी लोकशाही आघाडी मुख्यमंत्री ओमन चंडी यांच्यावर आरोप करीत असून त्यांनी लक्ष्मणरेषा ओलांडली आहे. राज्यात कोणताही राजकीय पेचप्रसंग निर्माण झालेला नाही. त्यामुळे राज्याच्या नेतृत्वात बदल करण्याची गरज असल्याचे वाटत नाही, असेही अ‍ॅण्टनी यांनी स्पष्ट केले.
सौर ऊर्जा घोटाळ्याचा आरोप करण्यात आला तेव्हा सरकारने त्याच्या चौकशीचे आदेश दिले. त्यामुळे ही चौकशी पूर्ण होऊ द्या. सध्या चौकशीची प्रक्रिया सुरू आहे. विरोधी पक्ष याबाबत हिंसा घडवून मुख्यमंत्र्यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करीत आहे, असा गंभीर आरोपही अ‍ॅण्टनी यांनी यावेळी केला.