हिमस्खलनामुळे काश्मीरमधील स्थिती अतिशय प्रतिकूल आहे. काश्मीरमध्ये एका तरुण सैनिकाला त्याच्या आईचा मृतदेह खांद्यावर टाकून पायपीट करावी लागते आहे. नियंत्रण रेषेच्या जवळ असणाऱ्या गावाजवळ पोहोचण्यासाठी सैनिकाने त्याच्या नातेवाईकांसह बर्फातून मार्गक्रमण सुरू केले आहे. एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीने या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.

भारतीय लष्करात सेवा बजावणाऱ्या मोहम्मद अब्बास यांचे काही नातेवाईक नियंत्रण रेषेजवळील गावात राहतात. आईचा दफनविधी करण्यासाठी मोहम्मद अब्बास यांना गावी जायचे आहे. यासाठी त्यांना गेल्या काही दिवसांमध्ये प्रचंड हिमवृष्टी झालेल्या भागातून वाट काढावी लागणार आहे. मोहम्मद अब्बास यांना जवळपास ५० किलोमीटर ट्रेकिंग करावे लागणार आहे. यासाठी त्यांना कमीतकमी १० तासांचा कालावधी लागेल. मोहम्मद अब्बास मुख्य महामार्गाने गावी जायला निघाले आहेत. मात्र या रस्त्यावर ६ फूट बर्फ जमा झाला आहे. त्यामुळे आईला खांद्यावर घेऊन वाटचाल करणे मोहम्मद अब्बास यांना अतिशय कठिण होते आहे.

वयाच्या २५ व्या वर्षापासून मोहम्मद अब्बास पठाणकोटमध्ये तैनात आहेत. मोहम्मद यांची आई सकीना बेगम त्यांच्याच सोबत राहायची. पाच दिवसांपूर्वी सकीना यांचे निधन झाले. आईचा मृतदेह काश्मीरमधील गावात हेलिकॉप्टरने पोहोचवला जाईल, असे आश्वासन स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आले होते, अशी माहिती मोहम्मद अब्बास यांनी दिली आहे. ‘हे खूप लज्जास्पद आणि निराशाजनक आहे. मी माझ्या आईचा दफनविधीदेखील नीट करु शकत नाही. प्रशासनाने आम्हाला वाट पाहायला सांगितले. मात्र हेलिकॉप्टर पाठवलेच नाही. मी माझ्या आईच्या मृतदेहासोबत गावी जायला निघालो आहे. मात्र वाट अत्यंत अवघड आणि परिस्थिती प्रतिकूल आहे. आम्ही ज्या रस्त्याने जातो आहोत, तिथे हिमस्खलन होण्याचा धोका आहे,’ अशा भावना मोहम्मद अब्बास यांनी एनडीटीव्हीसोबत बोलताना व्यक्त केल्या.

कुपवाडाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मोहम्मद अब्बास यांना आईचा मृतदेह गावी नेण्यासाठी हेलिकॉप्टर पुरवण्यात आले असल्याचे सांगितले. ‘आम्ही एका चॉपरची व्यवस्था केली होती. मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी नकार दिला. हिमवृष्टी होत असल्याने त्यांना हेलिकॉप्टर उड्डाण करु शकेल का, याबद्दल शंका होती,’ असे कुपवाड्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

मोहम्मद अब्बास यांनी मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या दाव्यात कोणतेही तथ्य नसल्याचे म्हटले आहे. ‘आम्ही चार दिवसांपासून सरकारी मदतीची वाट पाहात होते. या कालावधीत कुपवाडाच्या अधिकाऱ्यांनी आमच्यासोबत फोनवरुनही संवाद साधल नाही,’ असे मोहम्मद अब्बास यांनी म्हटले.

गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये जोरदार हिमवृष्टी झाली आहे. यामुळे झालेल्या हिमस्खलनामुळे २० सैनिकांचा मृत्यू झाला आहे. काश्मीर खोऱ्यातील काही भागांमधील वीजपुरवठा खंडित झाला आहे. यासोबतच अनेक भागांचा संपर्कदेखील तुटला आहे.