01 October 2020

News Flash

‘बलिदान विसरणार नाही’, हंदवाडा चकमकीवर नरेंद्र मोदींचे टि्वट

काश्मीर खोऱ्यातील हंदवाडा येथे दहशतवाद्यांविरुद्ध लढताना शहीद झालेले अधिकारी आणि जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

काश्मीर खोऱ्यातील हंदवाडा येथे दहशतवाद्यांविरुद्ध लढताना शहीद झालेले अधिकारी आणि जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. “हंदवाडा चकमकीत शहीद झालेल्या शूर जवानांना श्रद्धांजली, त्यांचा पराक्रम आणि बलिदान कधीही विसरणार नाही. त्यांनी पूर्णपणे निष्ठेने देशाची सेवा केली. आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी अविश्रांत मेहनत घेतली” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

नेमकं काय घडलं?
हंदवाडा मोहिमेच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी घुसलेल्या भागात राहणाऱ्या लोकांना बाहेर काढण्यासाठी लष्कराचे पाच जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील एक जवान अशा सहा जणांच्या टीमने इथं प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी इथल्या नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेरही काढलं. दरम्यान, इथं लपून बसलेल्या दहशतवाद्यांना जवानांची चाहूल लागल्याने त्यांनी मोठ्या प्रमाणावर गोळीबार सुरु केला. जवानांनीही याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले. मात्र, आपल्या दोन लष्करी अधिकाऱ्यांसह दोन जवान आणि एक जम्मू-काश्मीर पोलीस दलातील सब इन्सपेक्टर असे पाच जण शहीद झाले.

कर्नल आशुतोष शर्मा यांच्या पराक्रमाची गोष्ट
जम्मू-काश्मीरच्या हंदवाडामध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करताना २१ राष्ट्रीय रायफल्स युनिटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल आशुतोष शर्मा शनिवारी शहीद झाले. दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये त्यांनी नेहमीच आघाडीवर राहून नेतृत्व केले होते. दहशतवा्द्यांविरोधात लढताना दाखवलेल्या शौर्याबद्दल दोन वेळा कर्नल आशुतोष शर्मा यांना सेना पदकाने सन्मानित करण्यात आले होते. झी न्यूजने हे वृत्त दिले आहे.

मागच्या पाच वर्षात दहशतवाद्यांविरुद्ध लढताना शहीद झालेले कर्नल रँकचे ते पहिले अधिकारी आहेत. यापूर्वी जानेवारी २०१५ मध्ये ४२ राष्ट्रीय रायफल्सचे कर्नल एमएन राय आणि नोव्हेंबर २०१५ मध्ये ४१ राष्ट्रीय रायफल्सचे कर्नल संतोष महाडिक दहशतवाद्यांविरुद्ध झालेल्या चकमकीत शहीद झाले होते. कर्नल आशुतोष शर्मा यांच्या पश्चात पत्नी आणि १२ वर्षांची मुलगी असा परिवार आहे. ते बऱ्याच काळापासून काश्मीर खोऱ्यामध्ये तैनात होते.

एकदा कर्नल आशुतोष शर्मा आपल्या सहकाऱ्यांसमवेत रस्त्यावर असताना एक दहशतवादी कपडयांमध्ये ग्रेनेड लपवून त्यांच्या दिशेने येत होता. शर्मा यांनी लगेच त्याची चाल ओळखली व क्षणाचाही विलंब न लावता आपली बंदूक काढली व त्या दहशतवाद्याला तिथेच कंठस्नान घातले. आशुतोष शर्मा यांच्या सतर्कतेमुळे युनिटमधील जवानांचे आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे प्राण वाचले. यासाठी त्यांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. एका लष्करी अधिकाऱ्याने एएनआयला ही माहिती दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2020 5:12 pm

Web Title: soldiers valour and sacrifice will never be forgotten narendra modi on handwara encounter dmp 82
Next Stories
1 देशासाठी सर्वोच्च बलिदान! कर्नल आशुतोष शर्मा यांच्या पराक्रमाची गोष्ट
2 लष्काराला मोठं यश; तोयबाच्या टॉप कमांडरचा हंदवाडात खात्मा
3 पॉझिटिव्ह बातमी : करोनाचा गुणाकार मंदावला, रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग १२ दिवसांवर; मृत्यूदरही सर्वांत कमी
Just Now!
X