इराणचा टॉप लष्करी कमांडर कासिम सुलेमानीला संपवण्याच्या निर्णयाचे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समर्थन केले आहे. कासिम सुलेमानीच्या मृत्यूने दहशतीच्या रजवटीचा अंत झाला आहे असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

कासिम सुलेमानीचे काय आहे दिल्ली कनेक्शन?
कासिम सुलेमानीच्या मृत्यूने दहशतीच्या राजवटीचा शेवट झाला आहे. कासिम सुलेमानीने अनेक निरपराध लोकांची हत्या केली. नवी दिल्लीपासून ते लंडनपर्यंत दहशतवादी हल्ल्याचे कट रचण्यात त्याचा सहभाग होता असा आरोप ट्रम्प यांनी केला. सुलेमानीच्या अत्याचाराला बळी ठरलेल्या लोकांना आज न्याय मिळाला आहे. दहशतीचा शेवट झाला आहे असे ट्रम्प म्हणाले.

“मागच्या २० वर्षांपासून मध्य आशियामध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी सुलेमानी दहशतवादी कारवाया करत होता असा आरोप त्यांनी केला. अमेरिकेने काल जे केले ते आधीच करायला हवे होते. अनेकांचे प्राण वाचले असते. सुलेमानीने अमेरिकेच्या राजनैतिक आणि लष्करी अधिकाऱ्यांवर हल्ल्याचे षडयंत्र रचले होते. पण त्याआधीच आम्ही त्याचा खात्मा केला” असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

“माझ्या नेतृत्वाखाली अमेरिकेचे धोरण स्पष्ट आहे. जर कोणी अमेरिका किंवा अमेरिकन नागरिकांना  इजा पोहोचवणार असेल तर, त्याला आम्ही कुठूनही शोधून काढू व त्याचा खात्मा करु. आम्ही नेहमीच आमचे राजनैतिक अधिकारी, अमेरिकन जनता आणि सहकाऱ्यांचे रक्षण करतो” असे ट्रम्प यांनी सांगितले.

सलग दुसऱ्यादिवशी अमेरिकेचा एअर स्ट्राइक
अमेरिकेनं सलग दुसऱ्या दिवशी इराकवर एअर स्ट्राईक केल्याची माहिती समोर आली आहे. या हवाई हल्ल्यात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला. भारतीय वेळेनुसार शनिवारी बगदादजवळील ताजी रोजनजीक हा अमेरिकन हवाई दलाच्या विमानांनी हवाई हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी ब्रिटन आणि इटलीच्या सैन्याचे तळही असल्याचंही सांगण्यात येत आहे.

या हवाई हल्ल्यात दोन गाड्यांवर निशाणा साधण्यात आला. या गाड्यांमध्ये इराण समर्थक मिलिशिया हश्‍द अल-शाबीचे काही लोक असल्याचं म्हटलं जात आहे. या गाडीत असलेल्या सहाही जणांचा मृत्यू झाला आहे. अद्याप त्यांची ओळख पटली नाही, असं इराक सरकारी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. समोर आलेल्या माहितीनुसार अमेरिकेनं हा हल्ला हशद-अल-साबीच्या कमांडरला लक्ष्य करून केला होता. इराकमधील सरकारी माध्यमांनीदेखील या हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.