पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमधील तिढा संवादाच्या माध्यमातून सोडविण्याचे आवाहन केले. ते मंगळवारी मध्य प्रदेशातील अलिराजपूर येथे बोलत होते. लोकशाहीत प्रश्न सोडविण्यासाठी संवादाचे माध्यम उपलब्ध आहे. काश्मीरमधील जनतेने याठिकाणची शांतता आणि सलोखा कायम ठेवून या जागेची स्वर्ग म्हणून असलेली ओळख कायम ठेवावी, असे मोदींनी यावेळी सांगितले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या इन्सानियत, जमुरियत आणि कश्मीरियत या मंत्रावर माझ्या सरकारचा विश्वास आहे. काश्मीरी लोकांनाही देशातील इतर भागातील लोकांइतकेच स्वातंत्र्य आहे. भारतातील जनतेच्या मनात काश्मीरबद्दल प्रेम आहे. मात्र, याठिकाणच्या काही शक्तींमुळे काश्मिरयतच्या परंपरेला धोका निर्माण झाल्याचे मोदी यांनी सांगितले. ज्या वयात लहान मुलांच्या हातात लॅपटॉप, बॅट आणि चेंडू असायला हवेत त्या वयात काश्मीर खोऱ्यातील मुलांच्या हातात दगड आहेत. काश्मीरमधील जनतेला शांतता हवी आहे आणि केंद्र सरकार त्यासाठी सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन यावेळी मोदींनी दिले.
काश्मिरमधील हिंसाचार आटोक्यात आणून जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी तेथील जनतेशी संवाद साधण्याची गरज जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केली होती. मुफ्ती यांनी सोमवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन काश्मीरमधील स्थितीबाबत चर्चा केली. जम्मू-काश्मीरमधील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्याची मोहीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू करायला हवी. तात्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात जम्मू-काश्मीरच्या जनतेची मने जिंकण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना पुन्हा हाती घ्यायला हव्यात, असे मुफ्ती यांनी सांगितले होते.