करोना लसीसंदर्भात मुस्लिम समुदयाकडून व्यक्त केल्या जाणाऱ्या संशयाच्या पार्श्वभूमीवर एका भाजपा आमदाराने वादग्रस्त विधान केलं आहे. मेरठमधील सरधानाचे भाजपा आमदार संगीत सोम पत्रकारांशी बोलताना म्हणाले, “ज्यांना वैज्ञानिकांवर विश्वास नाही त्यांनी पाकिस्तानात जावं.”

सोम म्हणाले, “कोविड-१९च्या लसीकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं हे दुर्दैवी असून काही मुस्लिम लोकांचा देशावर भरवसा नाही. ते देशातील वैज्ञानिक, पोलीस आणि पंतप्रधानांवर विश्वास ठेवायला तयार नाहीत. त्यांना पाकिस्तानच जवळचा वाटत आहे, तर त्यांनी पाकिस्तानातच जावं. पण वैज्ञानिकांवर अविश्वास दाखवू नये”

संगीत सोम यांचं हे वक्तव्य अशा वेळी आलं आहे ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने देशवासियांना करोना लस घेण्याचं आवाहन करत आहेत. त्यांनी नुकतेच पहिल्या टप्प्यात कोविड योद्ध्यांसाठी लस मोफत देण्याची घोषणा केली होती.

‘कोविशिल्ड’ मुंबईत आली हो…! पहा फोटो

दरम्यान, जगभरातील मुस्लिमांनी करोना प्रतिबंध लस ही डुकराची चरबीयुक्त लस असल्याचे सांगत त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्यावर विविध लस निर्मिती कंपन्यांनी म्हटलं होतं की, आम्ही आमच्या लसीमध्ये आम्ही कोणत्याही प्रतिबंधीत गोष्टीचा वापर करत नाही. मात्र, वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की, लसीला स्थिर ठेवण्यासाठी त्यात डुक्कराच्या चरबीचा वापर करणं गरजेचं बनतं. त्यामुळे लसींवर मुस्लिम समुदायानं शंका व्यक्त केली आहे.